विमा कंपनीचे फाईल्स फेकून संगणकही तोडले
अमळनेर (प्रतिनिधी) नुकसान होऊनही भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओरिएंटल इंस्युरंस कंपनीच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात जाऊन अमळनेरच्या शेतकऱ्यांनी दंगडो करून अधिकाऱ्यांना धारेवार धरले. विमा कंपनीने पुन्हा दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समिती टॅक (टी ए सी) कडे अपील करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक संताप व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील ४७ हजार शेतकऱ्यांना कापूस पीक विम्याची मिड सिझन ची २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर झाली. मात्र सरकारी ओरिएंटल इंस्यूरन्स कंपनीने जिल्ह्याचे आदेश फेटाळून विभागावर आयुक्तांकडे अपील केले. त्या ठिकाणी किसान काँग्रेसचे कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना उघडे पाडले. आणि आयुक्तांनी विमा कंपनीचे अपील फेटाळले. विमा कंपनीने पुन्हा राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले. याबाबत शेतकरी अनभिज्ञ होते. मात्र राज्य शासनाने कृषी तज्ञ , शास्त्रज्ञ यांची मते जाणून घेत विमा कंपनीचे अपील फेटाळले. तरी देखील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची ७२ कोटी रुपये रक्कम मिळाली नाही म्हणून शेतकरी संतप्त झाले. विम्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून हात झटकले. म्हणून अखेरीस शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील , किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पस्ते , प्रदेश उपाध्यक्ष किशोर वानखेडे ,ऍड राम कुलाटे (जालना), जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील , डॉ अनिल शिंदे , धनगर पाटील , मयूर पाटील , गिरीश पाटील , बाजार समिती संचालक नितीन पाटील , डॉ श्याम देशमुख , समाधान कंखरे , नीलकंठ पाटील, बबन पाटील आदींनी ओरिएंटल इंस्युरन्सचे नागपूर येथील मुख्य कार्यालय गाठले. तेथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होती. प्रा. सुभाष पाटील त्यांचे प्रत्येक मुद्दे खोडून काढत होते. अधिकारी दाद देत नसल्याने अखेरीस अमळनेरचे शेतकरी संतप्त झाले. दांगडो घालत विमा कंपनीचे फाईल्स फेकून संगणकही तोडले. पोलिसांना पाचारण करण्यात आले.अमळनेरच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. मात्र शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची भूमिका योग्य असल्याचे म्हणत विमा अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली नाही आणि पोलिसांना अखेरीस शेतकऱ्यांना सोडून द्यावे लागले. त्यांनंतर मात्र विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती कबुल करून आम्ही दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले असल्याचे सांगितले. त्यावर प्रा सुभाष पाटील यांनी संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना कोणतीच माहिती दिली जात नाही ,अपडेट दिले जात नाही असे आरोप केले. तेंव्हा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करून प्रत्येक कार्यवाही वेळोवेळी पदाधिकाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना मोबाईल वर कळवू असे लेखी आश्वासन दिले.