वावडे येथील घटना, पोलिसांत आत्महत्येची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळ, नापिकी व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेत तालुक्यातील वावडे येथील तरुण शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली केल्याची घटना दिनांक ५ रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वावडे येथील नितीन लोटन पाटील (वय ३३) हा शेती करून उदरनिर्वाह करत होता. दिनांक ५ रोजी त्याने जुपने केलेल्या शेतात निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे समजताच त्याचे काका व ग्रामस्थांनी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, चार वर्षाची मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. नितीन हा काही दिवसांपासून दुष्काळ, नापिकी व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेत असल्याची गावातून माहिती मिळाली आहे. नीलकंठ पाटील यांच्या माहितीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोना सुनील तेली करीत आहे. दरम्यान, दिनांक ४ रोजी ही एका सोळा वर्षीय तरुणाने वावडे येथे गळफास घेतला होता व दुसऱ्या दिवशी तरुण शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.