अॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात केले मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे पाऊस केव्हा पडेल आणि पेरणी केव्हा करावी यासह मान्सूनच्या विविध टिप्स हवामान तज्ञ पंजाबराव यांनी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिल्या. तसेच यंदाही भरपूर पाऊस पडेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. निमित्त होते, अॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याचे….
अमळनेर येथे अंबिका मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना हवामान तज्ञ पंजाबराव डख म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्रात १० जुलै ते १५ जुलै ,१८ जुलै पाऊस पडतोच , १६ सप्टेंबर पासून पाच दिवस पाऊस पडतोच. तसेच २ डिसेंबरपासून पाच दिवस अवकाळी पाऊस पडतोच. असा दावाही त्यांनी केला. वेळोवेळी महाराष्ट्रातील जनतेला मी पावसाचे अंदाज देऊन सावध करत असतो मात्र तरीही काही संकेत सांगून त्यांनी शेतकरी स्वतः पावसाचा किंवा दुष्काळाचा अंदाज लावू शकतात असेही सांगितले. तसेच निसर्गाचे चक्र बदलले असून प्रत्येक ऋतू बावीस दिवसांनी पुढे सरकला असल्याने शेतकऱ्यांनी ७ जून ऐवजी २७ ते २८ जूनला पेरणी करावी म्हणजे पिकांच्या आणि निसर्गाच्या अनियमितपणाच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही असा दावा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर आभार भारती पाटील यांनी मानले. या शेतकरी मेळाव्यास माजी कुलगुरू एस ए पाटील , प्रा शाम पाटील ,संचालक पराग पाटील ,तालुका काँग्रेस अध्यक्ष गोकुळ बोरसे , माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे ,माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील ,समाधान धनगर , प्रेमराज चव्हाण , धनगर पाटील ,पोलीस निरीक्षक विजय शिंदे उपस्थित होते
शेतकर्यांनी कसा ओळखावा पाऊस ?
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचे अंदाज सांगितले जसे की , संध्याकाळी पश्चिमेला आकाशात लाल झाले की , घरातील दिव्यांवर किडे आले की तीन दिवसात पाऊस पडतोच, ढगांमुळे ध्वनिकम्पनात बदल होतात. पावसाळ्यात आकाशातील विमानाचे आवाज आले की समजावे की पाऊस येईल ,शेतातील सरडा अंगावर व मानेवर लाल रंग बदलवून घेत असेल तर आठ दिवसात पाऊस येतोच. तसेच तुमच्या गावात १५ मे ते ३० मे दरम्यान अवकाळी पाऊस किंवा थेंब पडले तर येत्या वर्षी तुमच्या गावात पाऊस पडेलच. ज्या वर्षी बिबव्याच्या झाडाला भरपूर फुले आली किंवा गावठी आंब्याला खूप आंबे लागले की समजावे पुढील वर्षी दुष्काळ पडणार आहे. ११ जूनला सूर्याकडे पाहिले असता जर त्याभोवती कडे दिसले तर समजावे की दुष्काळ पडेल. दरवर्षी २२ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान नदी काठ अथवा नाला यांच्या काठावर आजूबाजूला १ किमी परिसरात गारपीट होते. असेही डख यांनी ठामपणे सांगितले. तसेच १ ते ५ ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस पडणार आहे.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यास आत्महत्या थांबतील : अॅड. ललिता पाटील
यावेळी बोलताना अॅड. ललिता पाटील म्हणाल्या की , जेव्हा शेतकऱ्यांसाठी शासन स्वतंत्र मंत्रालय काढेल त्यादिवशी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आजपर्यंत एकही खमका पुढारी आला नाही की जो धरण पूर्ण करू शकतो. कुणालाच असे वाटत नाही की माझा मुलगा शेतकरी व्हाव अशीही खंत अॅड. पाटील यांनी व्यक्त केली.