शोषण व आरटीई कायद्याचे उल्लंघन झाल्याचा विरोधकांकडून आरोप
अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल पाटील शहरात प्रथमच आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी शहराबाहेरील ताडेपुरा भागातील निवासी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हात उपाशी उभे करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शोषण व आरटीई कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
शासनानेच मंत्री अथवा व्हीआयपी व्यक्तींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असा नियम बनवला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अशा कार्यक्रमाना विद्यार्थांना नेले जात नव्हते. मात्र ७ जुलै रोजी नव्याने पदभार घेतलेले कॅबिनेट मंत्री यांच्या स्वागतासाठी भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी ,भाजप पदधिकारी व शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ताडेपुरा भागातील आश्रम शाळेबाहेर गर्दी केली होती. शाळेचे अनेक विद्यार्थी सकाळी बऱ्याच वेळेपासून रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आले होते. सकाळी अकराची वेळ असल्याने मुलांची जेवणाची वेळ असावी , मुले ताटकळत उभे असल्याने थकले होते. मंत्र्यांची गाडी येताच मुलांनी त्यांना सलामी देखील दिली. विशेष म्हणजे ही संस्था माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचीच आहे. मंत्र्यांच्या स्वागतासाठी मुलांचे शोषण करण्याची काय आवश्यकता होती असा सवाल विरोधकांनी केला आहे.
मंत्र्यांचा ताफा ,बंदोबस्त आणि प्रोटोकॉल पाहण्यासाठी विद्यार्थी होते उभे
मुलांना मंत्र्यांचा ताफा ,बंदोबस्त आणि प्रोटोकॉल कसा असतो हे बघायचे होते म्हणून ते रस्त्यावर आले होते. त्यांच्या नागरिकशास्त्र ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांना सवलत दिली होती. शोषण किंवा बळजबरी केली नाही.
– जाकीर शेख ,लिपिक
विद्यार्थ्यांना उन्हात उपाशी उभे केल्याने मंत्री अनिल पाटील यांनी राजीनामा द्यावा
ज्या शासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवले त्याच शासनाच्या सत्तेत सहभागी होऊन आमदार अनिल पाटील यांनी अनैतिकतेने मंत्री पद मिळवले आहे. पक्षाशी त्यांनी एक प्रकारे गद्दारीच केली आहे. तर मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांच्या स्वागतासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हात उपाशी उभे राहून स्वागत करायला लावले हा संताप जनक प्रकार खपवला जाणार नाही. त्यामुळे अनिल पाटील यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, अमळनेर