म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी व्यक्त केला विश्वास
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात खान्देशातील ३० टक्के साहित्यिकांना संधी दिली जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले.
अमळनेर येथे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी विविध सूचना जाणून घेण्यासाठी जी. एस. हायस्कूल च्या आय एम ए सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. डॉ. जोशी पुढे म्हणाले की पहिल्या दिवशी बाल संमेलन आयोजित असेल. नव कविना संधी दिली जाईल. खान्देशातील साहित्यिक व कवींचे फलक लावून त्यांना सन्मान दिला जाईल. तीन रस्त्यांवर स्वागत कक्ष असतील. प्रा माधुरी भांडारकर, डॉ. अपर्णा मुठे, डॉ. कुणाल पाटील , हिरामण कंखरे ,बजरंग अग्रवाल, प्रा.मनीष करंजे ,डॉ. प्र. ज. जोशी , दिगंबर महाले , दर्शना पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. चिंधु वानखेडे यांनी ५ हजार रुपये देणगी जाहीर केली. व्यासपीठावर श्यामकांत भदाणे , रमेश पवार , नरेंद्र निकुंभ हजर होते. बैठकीस शहरातील सर्व स्तरातील रसिक हजर होते. सुत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.
साडे तीन हजार लोकांच्या मुक्कामाची सोय
अमळनेर व धुळे मिळून साडे तीन हजार लोक मुक्कामी राहू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा का मिळाला नाही या विषयावर न्यायालयासारखा परिसंवाद चर्चा सत्र आयोजित करण्यात येतील. विज्ञान निष्ठ साहित्य याचाही समावेश करण्याचा प्रयत्न असेल. असेही डॉ जोशी यांनी सांगितले.
संमेलनात साहित्याचा दर्जा असला पाहिजे
यावेळी माजी प्राचार्य एल ए पाटील आपले परखड मत मांडताना म्हणाले की साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला असता तर त्यावर चर्चा आणि सूचना करता आल्या असत्या , समाजाच्या हितात लिहिले जाते त्याला साहित्य म्हणतात. साहित्याच्या गुणवत्ते बाबत एकनिष्ठ राहणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी संमेलनात साहित्याचा दर्जा असला पाहिजे असे सांगून त्यांनी संमेलनासाठी २१ हजार रुपये देणगी जाहीर केली. प्रताप महाविद्यालयाचे
खान्देशातील साहित्यिकांना संधी मिळावी
मराठी विभाग प्रमुख प्रा. रमेश माने म्हणाले की गेल्या दहा वर्षात साहित्य संमेलनात खान्देशचे प्रतिनिधित्व किती होते याचाही विचार झाला पाहिजे. खान्देशात अनेक चांगले कवी असताना अखिल भारतीय साहित्य समेलनात संधी मिळत नाही. खान्देशातील साहित्यिकांना संधी दिली पाहिजे. अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णा पाटील , दिवंगत साहित्यिक ग दा कुडे , वा रा सोनार यांच्या नावांना संमेलनात यथायोग्य सन्मान मिळाला पाहिजे.