खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने उडाली दाणादाण, वृक्ष उन्मळून पडले

सुमारे एक तास वादळाने घातले थैमान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात रविवारी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. वादळ एवढे प्रचंड होते, की समोर काहीच दिसत नव्हते. सुमारे एक तास झालेल्या या वादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली व विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. यामुळे दिलासा मिळाला. तर शेतकरी राजा सुखावला आहे.
अमळनेर शहरासह ग्रामीण भागात दिनांक ४ जून रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक काळ्या ढगांनी आभाळ भरून आल्याने भर दुपारीच संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण झाले होते. अचानक जोरदार वारा सुटून शहरासह तालुक्यात झाडे उन्मळून पडली. तसेच अनेक गावात पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले. धार ते धानोरा फाट्यादरम्यान झाड पडल्याने एका बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शहरातील त्रिकोणी बगीचा , एल आय सी कॉलनी ,धुळे रोड चर्च जवळ ,मुंदडा नगर याठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. तसेच नाट्यगृहासमोर झाड पडून वीज तारा ही तुटून पडल्या होत्या. तालुक्यात उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. पालिका कर्मचारी ,विजकर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

लग्नात वर्‍हाडीची उडाली तारांबळ

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्न समारंभ होते. मात्र वादळी पावसामुळे वऱ्हाडीसह वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली. वाऱ्यामुळे मंडपाचे देखील नुकसान झाले असून ऐनवेळी लग्नाचे ठिकाण बदलवावे लागले.

शेतकऱ्यांचे झाले नुकसान

ज्या शेतकऱ्यांनी शेतात ठिबकच्या नळ्या अंथरल्या होत्या, त्या वाऱ्यामुळे गोळा झाल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. तसेच काही ठिकाणी ठिबकचे ही नुकसान झाले आहे. तालुक्यातील वासरे येथे बैलाच्या अंगावर झाड पडल्याने बैलाच्या पाठीचे हाड मोडले असून बैल गंभीर जखमी झाला असून बैलगाडीचे ही नुकसान झाले आहे. पातोंडा येथे रुग्णवाहिकेवर झाड पडून नुकसान झाले. मुंगसे ,जैतपिर , कळमसरे याठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शहरातही वादळाचा कहर

अमळनेरात वादळ आणि जोरात पाऊस काही ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या.
विद्युत वाहिन्याही कोसळल्याने पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. पटवारी कॉलोनी मंदिर परिसरात मोठे झाड उन्मळून पडले.
बालाजी पुराच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात तुरळक पावसानेच अशी परिस्थिती झाली, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न.पा.ला वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

पातोंडा व वासरे येथे शेतकर्‍यांना फटका

पातोंडा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून फांद्या देखील पडल्या आहेत.
अनेक घरांचे पत्रे व गुरांच्या शेडाचे पत्रे देखील उडाले आहेत. प्रा.आ.केंद्रामधील 108 रुग्णवाहिकेवर झाडं पडले आहेत. नांद्री येथील जी प शाळा आवारातील बहुतेक झाडे उन्मळून पडली आहेत.पातोंडा येथिल शेतकरी संगिता खेमराज बोरसे यांच्या गट न ३६५ मधील शेतातील सौर कृषी पंपाचे प्लेट्स ४० ते ५० फूट अंतरावर उडून गेल्याने सदर सौर पंपाच्या प्लेट्स फुटून नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकरी संगीता बोरसे यांनी केली आहे.
वासरे येथे वादळात निमाचे झाडे पडून बैल दाबला गेला व बैलगाडीही दाबली गेली बैलाचा हंबरडाचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी बैलाला बाहेर काढले. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button