लाचखोर बहिस्थ परीक्षकाला दोन दिवस खावी लागेल पोलिस कोठडीची हवा

न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याने दोन दिवसात पोलिस करणार सखोल चौकशी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील लाचखोर बहिस्थ परीक्षकाला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी अधिक तपासासाठी न्यायालयाने विद्यार्थी संबंधित प्रकरण असल्याने लाचखोराला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्याचे आता दोन दिवस पोलिस कोठडीत जाणार असून पोलिस त्याची अजून कसून चौकशी करणार आहेस.
अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत.यात विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. त्यांनी परीक्षार्थींना विनाकारण त्रास देणे, कॉपी चालू देण्यासाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत त्रास देणे सुरू केले. यात तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर ८ विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी.लिब) चे पेपर सुरू होते. विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १०० असे ९ विषयांसाठी एकूण ९०० रुपयांची अशी एकूण ७२०० रुपयांची मागणी त्यांनी विद्यार्थ्यांकडे केली. त्यानंतर २ जून रोजी पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील यांना तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी ५००० रुपये महाविद्यालयाच्या आवारात देत असतांनाच नाशिक ला.प्र.वि.नाशिकचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पथकातील राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे,संतोष गांगुर्डे यांनी पाटील यांना रंगेहाथ पकडून मुसक्या आ‌वळल्या होत्या. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
संशयित विजय पाटील याने यापूर्वी कोणकोणत्या पेपर करीत पैशांची मागणी केली आहे का.? एकूण किती विद्यार्थ्यांना मागणी केली, किती विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारले आहे आदी बाबींच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायाधिश पी. आर. चौधरी यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे पोलिसांना आता सखोल तपास करता येणार आहे. तर विजय पाटील याला दोन दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांकडून तक्रारदाराचे जोरदार स्वागत

बहिस्थ परीक्षक विजय पाटील यांनी पैशांच्या लालचे पायी परीक्षार्थीना बेजार केले होते. त्यातल्या त्यात या परीक्षेला ज्यांना रेग्युलर शिक्षण घेता येत नाही असे परीक्षा देतात. त्यात विवाहित महिलांचा समावेश आहे, अशा परीक्षार्थीना त्याने अधिक त्रास दिला. त्यामुळे या कारवाईचे स्वागत करीत तक्रारदार यांचे कौतुक करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर त्याने अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्यांनी जोरदार स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *