अमळनेर(प्रतिनिधी) किसान काँग्रेसतर्फे दिनांक १८ मे रोजी शेतमालाला नीचांकी भाव देवून शेतकऱ्याला जिवंतपणी मारणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ ६ जून रोजी अमळनेर येथे प्रतीकात्मक दशक्रियाविधीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
किसान काँग्रेसकडून दिनांक १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. देशात मोठ्या प्रमाणावर कापूस उपलब्ध असताना सरकारने ऑस्ट्रेलियाकडून कापसाच्या गाठी आयात केल्या आहेत. सरकारी अनास्था व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दररोज कापसाचा भाव घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिवंतपणे मारण्याचे काम सरकार करत असल्याने दिनांक ६ जून रोजी महाराणा प्रताप चौकात प्रतीकात्मक दशक्रियाविधी व श्राद्धाचे आयोजन करण्यात आले असून चटणी, कांदा, भाकरीचे भोजन आयोजित केले आहे. शेतकऱ्यांना नेत्यांचे मुखवटे घालून त्यांना याठिकाणी बसविण्यात येणार आहे. याठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी अशी विनंती करण्यात आली असून निवेदन देतेवेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, धनगर दला पाटील, जयवंतराव पाटील, नीलकंठ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिनांक ६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रा. सुभाष पाटील यांनी केले आहे.