अमळनेर (प्रतिनिधी) शाळांजवळ लहान मुलांना तंबाखू ,सिगारेट सारख्या बंदी असलेले पदार्थ विकणाऱ्या तालुक्यातील लोण खुर्द आणि निंभोरा येथील तीन पान टपरी चालकांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी शाळांजवळ बिडी ,सिगारेट तंबाखू विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. ३१ रोजी मिळालेल्या माहितीवरून सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने हेडकॉन्स्टेबल भरत ईशी , हेडकॉन्स्टेबल संजय पाटील ,फिरोज बागवान , तुषार वाघ , भरत गायकवाड , सुनील आगोने यांनी लोण खुर्द येथे मुडी प्र डांगरी रस्त्यावर जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ छापा टाकून मनवर शहा मेहबूब शहा फकीर (वय ६०) यांच्या महाराष्ट्र पान सेंटर , शाहरुख रशीद फकीर (वय २८) यांच्या गरीब नवाज पान सेंटर या दोन टपऱ्यांवर बिडी ,सिगारेट, तंबाखू यासारखे बंदी असलेले पदार्थ मिळून आले. तर निंभोरा येथे कलाली रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ दीपक सुभाष पाटील (वय ४७) यांच्या दीपक पान सेंटर वर देखील बिडी ,सिगारेट ,तंबाखू असे पदार्थ मिळून आले. पोलिसांनी तिघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला सिगारेट तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंधक व व्यापार वाणिज्य उत्पादने ,पूरवठा व वितरण यांचे अधिनियम कायदा २००३ कलम ६ ,२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.