खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाची मुदत देऊनही पोलीस वसाहतीची जागा केली नाही खाली

पैसा उपलब्ध आहे ,कागदोपत्री मंजुऱ्या मिळाल्या, तरी प्रशासकीय इमारतीचे घोडे अडलेले

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसाठी सात दिवसाची मुदत देऊनही अमळनेर शहरातील पोलीस वसाहतीची जागा खाली झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला विलंब होत आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश आणि आमदारांचे विनंती पत्र नुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १६ मे २०२३ रोजी पोलीस अधीक्षक याना पत्र दिले आहे की टीपी ६६-६७ मधील १३ हजार ५०० चौ मी जागेवरील पोलीस लाईनचे बांधकाम सात दिवसाच्या आत निष्काषित करून जागेचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याची कार्यवाही करावी. या जागेवरील घरे जीर्ण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोकादायक असल्याचा अहवाल देऊन जागा पोलिसांकडून खाली करून मिळावी असे पत्र १७ एप्रिल २०२३ रोजी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही दिले आहे. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रात म्हटले आहे.

अशी उभी राहणार प्रशासकीय इमारत

टी पी प्लॉट नंबर ६६-६७ च्या १३ हजार ५०० चौरस मीटर जागेवर उपविभागीय अधिकारी कार्यालय ,तहसीलदार कार्यालय व इतर कार्यालयांची मध्यवर्ती इमारत मंजूर झाली असून १५ मार्च २०२२ रोजी ११ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर २० जुलै २०२२ रोजी मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मंजुरी देखील दिली आहे. सध्यस्थीतीतील महसूल विभागाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. आणि नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये शहराच्या मध्यवर्ती भागात बसस्थानकाच्या जवळ असावीत म्हणून आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न करून हे काम मंजूर केले आहे. पैसा उपलब्ध आहे ,कागदोपत्री मंजुऱ्या मिळाल्या आहेत. मात्र काम सुरू होत नाही.

पोलीस विभाग जागा खाली करत नाही म्हणून प्रशासकीय इमारतीचे घोडे अडून

या जागेवर पोलीस कर्मचाऱ्यांची जुनी वसाहत आहे. काही अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. कर्मचारींची घरे जीर्ण आणि पडाऊ आहेत. मोजक्या आठ ते दहा घरात कर्मचारी राहतात. आणि पोलिसांची नवीन वसाहत ढेकू रस्त्यावर बांधण्यात आली असून त्याठिकाणी अधिकाऱ्यांचे बंगले देखील बांधण्यात आले आहेत. अनेक घरे रिकामे आहेत. मात्र पोलीस विभाग जागा खाली करत नाही म्हणून प्रशासकीय इमारतीचे घोडे अडून बसले आहे.

जुन्या पोलीस वसाहतीतील घरे जीर्ण धोकादायक

जुन्या पोलीस वसाहतीतील घरे जीर्ण धोकादायक आहेत आणि महसूल इमारती देखील धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करावे असे विनंती पत्र आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे दिले आहे.

प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा

जनतेच्या कामासाठी मला उच्च न्यायालयात जाऊन जनहित याचिका दाखल करावी लागली. अमळनेर तालुक्याच्या सोयीसाठी प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा हीच अपेक्षा राहील.
अनिल भाईदास पाटील ,आमदार अमळनेर

अद्याप वरिष्ठांकडून काही सूचना अथवा आदेश नाहीत

पोलीस कवायत मैदान व वसाहत खाली करण्याबाबत अद्याप वरिष्ठांकडून काही सूचना अथवा आदेश आलेले नाहीत. तसे प्राप्त झाल्यास सूचना अथवा आदेशाची अंमलबजावणी केली जाईल.
विजय शिंदे ,पोलीस निरीक्षक , अमळनेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button