भल्या पहाटे घटना घडल्याने उडाली खळबळ, चोरांनी पोलिसांसमोर उभे केले आव्हान
अमळनेर (प्रतिनिधी) पती सोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस कार मधून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तिची 15 ग्रॅम सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आर के नगर जवळ घडली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.मानसी गिफ्ट्स अँड ज्वेलरी शॉप फोडणाऱ्या चोरट्यांनीच ही लूट केली असून त्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की स्वामी समर्थ मंदिराजवळ राहणारे दीपक मेडिकलचे मालक रामलाल बाबूलाल पाटील हे आपल्या पत्नी रंजनाबाई रामलाल पाटील यांच्या सोबत दररोज पहाटे धुळे रस्त्यावर नियमित पायी फिरायला जात असतात,काल दि 14 रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता ते दोघेही फिरायला निघाले होते,पहाटेची वेळ असल्याने रस्ता निर्मनुष्य होता,आर के नगर जवळ ते पोहोचले असता समोरून येणारी सिल्व्हर रंगांची वॅगनार गाडी (एम एच 09 एकयु 1559,) अचानक त्यांचा जवळ थांबली. त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले चार जण खाली उतरले,हा प्रकार पाहून पतीपत्नी कमालीचे घाबरले होते. त्या चौघांपैकी एकाने चाकू काढून महिलेला धाक दाखवीत त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पोत कोणत्यातरी लहान हत्याराने एका सेकंदांत ओरबडली,यामुळे महिलेच्या मानेला थोडी जखमही झाली, यानंतर ते चोरटे पटकून वाहनात बसून धुळ्याकडे पसार झाले,सदर चोरट्यांकडे इतर हत्यारे देखील असल्याने नक्कीच ते मोठे दरोडेखोर असावे अशी खात्री त्यांची झाली होती,या घटनेने पतीपत्नी घाबरले असल्याने त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूला कुणीही नसल्याने ते हतबल होते,हा प्रकार सुरू असताना तेथे शेजारीच राहणारे माजी नगरसेवक राजेश पाटील यांना थोडा आवाज झाल्याने ते तेथे पोहोचले होते मात्र तोपर्यंत उशीर झाला होता,दुसरीकडे घाबरलेले पत्नीपत्नी पळतपळत गावाकडे आले त्यानंतर मुलाला सोबत घेत पहाटे 6 वाजताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठत ऑनलाइन तक्रार दाखल केली.
मानसी ज्वेलरीवर लुटणारेच आरोपी
शहरात दोन दिवसांपूर्वी चोरट्यानी पिंपळे रोडवरून वॅगनार गाडी चोरी करून मुंदडा पार्क जवळील मानसी गिफ्ट्स अँड ज्वेलरी हे शॉप फोडून आठ ते नऊ लाखांचा माल लंपास केला होता,सदर चोरटे व ती गाडी सीसीटीव्ही कॅमरे व एका व्हिडीओ मध्ये कैद झाले होते,त्यानंतर कालच्या लुटीच्या घटनेनंतर काही सीसीटीव्ही तपासले असता तीच गाडी व तेच चोरटे दिसत असल्याने त्यांनीच ही लूट केल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस यंत्रणेला कामाला लावले आहे.
पोलिसांचे एक पथक धुळ्याकडे रवाना
चोरटे लूट करून धुळ्याकडे पसार झाले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलिसांचे एक पथक धुळे येथे रवाना केले असून तेथे गोपनीय माहिती घेऊन विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. सदर आरोपींनी चोपडा येथेही याच रात्री लूट केल्याची माहिती मिळाली आहे, दुहेरी गुन्ह्यामुळे सदर चोरटे पोलिसांसाठी आव्हानच ठरले आहेत.