भविष्याच्या दृष्टीने सोयीच्या ठरणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यातच पडणार सभापती पदाची माळ
अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर बाजार समितीची निवडणूक संपली असली तरी आता सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे राजकारण तापले आहे. यासाठी प्रत्येक जण नेत्याकडे लॉबिंग करीत आहे. यामुळे नेत्यांना ताप तर उमेदवारांना जोर चढला आहे. तरीही भविष्याच्या दृष्टीने सोयीच्या ठरणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यातच सभापती पदाची माळ टाकण्यात येणार आहे, तशी नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सहकार पॅनेलच्या माध्यमातून मिळालेल्या यशाच्या नंतर मार्केटचा सभापती कोण होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. आघाडीतील अनेक उमेदवार स्वतःच्या बळावर आणि अर्थपुर्ण नियोजनावर निवडून आलेले असल्याने ते सभापती पदाचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. तर सभापतीपदासाठी काँग्रेसला संधी दिल्यास डॉ. अनिल शिंदे हे एकमेव पर्याय असतील. मात्र डॉ.शिंदे यांचा यशाचा आलेख पहाता भविष्यात अडसर नको म्हणून त्यांना डावलून किंवा थांबवून प्रा.सुभाष पाटील यांनाही पुढे करण्याची खेळी पॅनल प्रमुख आ.अनिल पाटील यांच्याकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील हे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे आधीच तालुक्याच्या पक्ष संघटना बांधण्याचे जबाबदारीचे पद आहे.’एक व्यक्ती एक पद’ या न्यायाने इतर कोणत्याही पदावर नसलेल्या जबाबदार उमेदवाराला संधी हवी अशी कुजबूज त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करीत आहेत. तसेच आ.अनिल पाटील यांनी निवडलेल्या उमेदवारांशी सभापती पदाबाबत कोणतीही चर्चा केलेली नसतांना सचिन पाटील यांचेसहकाऱ्यांमार्फत “सभापती सचिन पाटील” असा संदेश फिरवून वातावरण निर्मिती होत असतानाच आमदार अनिल पाटील यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे का? याबाबत तर्कवितर्क वाढविले जात आहे.त्यांच्या एका व्हाट्सअप्प ग्रुपचे नाव ही बदलून सभापती सचिन पाटील असे करण्यात आल्याचे ग्रुप मधील सदस्यांनी सांगितले.अनेकदा टोकाची भूमिका तर पक्षातील गटातटाच्या राजकारणात एकतर्फी बाजू घेणारे सचिन पाटील हजारो शेतकऱ्यांचा थेट संपर्क येणाऱ्या बाजार समितीत अनेकांना गैर सोयीचे वाटतात.
सचिन पाटील यांचेंबद्दलच्या पक्षांतर्गत कुरकुरी व नाराजी लक्षात घेता आ.अनिल पाटील यांच्यापुढे तसाच तुल्यबळ पर्याय सेवा सोसायटी मतदार संघात आघाडीतर्फे सर्वाधिक मते घेणारे अशोक आधार पाटील यांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांसह आ.अनिल पाटील यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना तर काँग्रेसच्या जेष्ठ उमेदवारानाही ऐकून घेणारा नवखा व्यक्ती म्हणून “न्युट्रल” असलेले अशोक पाटील सोयीचे वाटतात.कृउबा निवडणुकीत पॅनलच्या अनेकांना अशोक पाटील यांनी रसद पुरवल्याची चर्चा आहे.तर निवडलेले उमेदवार सांभाळण्यासाठी आवश्यक तो खर्च करण्याची कुवत,नेत्यांच्या शब्दावर काम करण्याची सवय आणि वागण्या- बोलण्यातील नम्रपणा त्यांची जमेची बाजू आहे.निवडलेले संचालक यांच्यासाठी सोयीचे असलेले अशोक पाटील हे आ.अनिल पाटील यांच्यादृष्टीने भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील मोठा जि प गट एकहाती सांभाळण्याची कुवत ठेवून आहेत. अशोक पाटील यांची भविष्यातील राजकीय उपयोगिता हेरूनच आ.अनिल पाटील हे त्यांच्यावर विश्वास दाखवू शकतात अशी चर्चा जाणकार करीत आहे.
हे मानले जाताय प्रमुख दावेदार
काँग्रेसचे नेते डॉ अनिल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील आणि तालुक्याच्या राजकारणात नव्याने आपली ओळख निर्माण करणारे अशोक आधार पाटील यांना सभापती पदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार समजले जात आहे.
माजी आमदार शिरीष चौधरीकडून खेळी?
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या राज्यावर बदलत्या राजकीय समीकरणात माजी आमदार स्मिताताई वाघ यासुद्धा जेष्ठत्वाच्या नात्याने सभापतिपदी आरूढ होऊ शकतात.तर दुसरीकडे आघाडीतील सभापती उपसभापती निवड बिनविरोध न झाल्यास गडबड होऊ शकते. मा.आ.शिरीष चौधरी यांनी मविआ च्या पॅनल मधल्या काही तुल्यबळ उमेदवारांना आपले निवडलेले उमेदवार सभापतीपदासाठी पाठींबा देऊ शकतील असा संदेश दिल्याची चर्चा आहे. मा.आ.शिरीष चौधरी हे मा.आ.स्मिताताई वाघ यांचेव्यतिरिक्त निवडून आलेल्या भाजपच्या तीन सदस्यांना सत्तेत बसवण्यासाठी हालचाली करीत असल्याने तालुक्यातील कृउबा निवडणुकीनंतरचे राजकारण अजूनही तापलेले आहे.