अर्ज खरेदी व दाखल करण्याची मुदत 11 मे पर्यंत असून या मुदतीत उमेदवारी अर्जांचा पडणार पाऊस
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अर्बन को ऑप बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज खरेदीसाठी एकच गर्दी केली. 31 जणांनी अर्ज घेतले. त्यापैकी दोन जणांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याची मुदत 11 मे पर्यंत असून या मुदतीत उमेदवारी अर्जाचा पाऊसच यंदा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
येथील अर्बन को ऑप बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. पहिल्या दिवशी 31 जणांनी 81 उमेदवारी अर्ज खरेदी केले.तर सर्वसाधारण प्रवर्गातून विद्यमान संचालक प्रदीप कुंदनलाल अग्रवाल व अनु जाती जमाती मधून रघुनाथ मोरे या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरपालिका निवडणूक प्रचंड लांबत चालली असल्याने बाशिंग बांधून तयार असलेले पालिकेतील इच्छुक उमेदवार कमालीचे नाराज आहेत मात्र अश्यातच अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने याच इच्छुकांना आता अर्बन बँकेचा संचालक होण्याचे डोहाळे लागले असून यासाठी तयारीला ते लागले आहेत,यामुळेच यंदा उमेदवारी करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली असून उमेदवारांची संख्या यंदा अधिक असण्याची शक्यता आहे.हवशा गवशा नवश्या उमेदवारांची संख्या अधिक राहणार असली तरी खरी लढत तुल्यबळ उमेदवारामध्येच होणार आहे.