शासनाच्या वतीने लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांच्या 21 लाख 45, हजार 332 रुपये रकमेच्या अपहारप्रकरणी मारवड पोलीसात शासनाच्या वतीने लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर लेखापरीक्षक भिकण पाटील यांनी मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण केले असता सचिवाने कर्जदाराच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. त्यात 21 लाख 45 हजार 332 रुपये रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यात 7 लाख 96 हजार 934 रुपये रकमेचा तात्पुरता अपहार व 13 लाख 48 हजार 398 रुपये रकमेचा कायमस्वरूपी अपहार केल्याचा अहवाल सादर केला आहे. एकूण अपहार रकमेपैकी 12 कर्जदारांची रक्कम सचिवाने भरली असून व 7 कर्जदारांची कर्जाची मुद्दल रक्कम 13,48,398 व त्यावरील व्याज भरणे बाकी आहे. या सर्व बाबींचा विचार करता तत्कालीन सचिव वसंतराव पुरुषोत्तम पाटील याने कर्जदार सभासदांच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून संस्थेचा व सभासदांचा विश्वासघात केला आहे. या पूर्ण आर्थिक गैरव्यवहारास सचिव हेच जबाबदार असल्याने शासनाच्या वतीने लेखापरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 420 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.