अमळनेर (प्रतिनिधी) उच्च न्यायालयच्या आदेशाने तालुक्यातील मांडळ येथील सरपंच पदाची निवडणूक तुर्त स्थगित करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ येथील सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी १ रोजी निवड जाहीर करण्यात आली होती. अध्यासी अधिकारी मंडलाधिकारी विठ्ठल पाटील यांनी प्रक्रिया सुरू केली. सरपंच पदासाठी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कुसुमबाई भास्कर पाटील ,मीनल सुरेश कोळी,सुरेखा भीमराव पाटील या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले. दोन वाजेला सरपंच पदासाठी मतदान होणार होते मात्र दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठातील सरकारी अभियोक्त्यांचा तहसीलदारांना फोन आला आणि पुढील आदेश येईपर्यंत तूर्त निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी असे आदेश दिले. तहसीलदारांनी तातडीने अध्यासी अधिकारी विठ्ठल पाटील यांना पत्र पाठवून निवड स्थगित केली. मांडळ येथील आठ ग्रामपंचायत सदस्यांना मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सदस्यांचा अपात्रतेबाबत निर्णय लागत नाही तोपर्यन्त निवडणूक घेऊ नये अशी याचिका क्रमांक २४५४ एका गटातर्फे औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी असताना स्थगिती आदेश देण्यात आला.