अमळनेर(प्रतिनिधी) वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुप्रसिध्द कवी रमेश पवार यांना मुख्य काव्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित केले आहे.
अमळनेर आणि खानदेश परिसरात गेल्या पंधरा ते वीस वर्ष साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असलेले कवी रमेश पवार यांना काव्यवाचनाची मिळालेली संधी अमळनेरचा साहित्य क्षेत्राचा लौकिक वाढविणारा आहे.
आचार्य विनोबा भावे सभामंडपात ४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री निमंत्रितांचे काव्यवाचन होणार आहे. आधीही कवी पवार यांनी सांगली, महाबळेश्वर, ठाणे, उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून रसिकांची दाद मिळवलेली आहे. निमंत्रित कवी म्हणून रमेश पवार यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल अमळनेरातील सर्व साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद, म वा मंडळ, पू सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालय तसेच खानदेश साहित्य आणि रसिक परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे.