अमळनेर (प्रतिनिधी) आनंदनगर भागात सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडून दहा हजार चोरल्याची घटना १६ रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र लक्ष्मण देशमुख (रा .आनंदनगर) हे ८ रोजी आपल्या मुलीकडे जळगाव येथे गेले होते. १६ रोजी पहाटे त्यांच्या शेजारील जगदीश दामोदर सोनवणे यांनी देशमुख यांना फोन वरून कळवले की तुमच्या घराच्या दरवाजाच्या कडी कोंडा तोडलेला दिसत आहे. देशमुख तातडीने अमळनेर आले असता त्यांना घरातील कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. कपाटातील दहा हजार रुपये चोरलेले आढळून आले. तसेच शेजारील सोमेश्वर श्रावण मालखेडे यांची ८ हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच १८ यु ९७४३ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघड झाले आहे. देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.