एकाच कुटुंबातील होत्या दिराणी व जेष्ठानी
अमळनेर (प्रतिनिधी) मध्य प्रदेशातील सिहोरला रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या पातोंडा येथील एकाच कुटुंबातील दिराणी व जेष्ठानीच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची ४ वाहने १३ फेब्रुवारी रोजी सीहोरला शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेली होती. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले. मात्र, रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांनी रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाली.
या वाहनांपैकी एमएच १९ डीव्ही ६७८३ या क्रमाकांचे वाहनावरील चालकाचे पहाटे पाच वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन झाडावर आदळले. वाहनात एकूण ६ जण होते, त्यापैकी शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या वाहनाच्या मागून गावातील इतर भाविकांची वाहने येत होते, त्यामुळे अपघाताची घटना समोर आली. चार जणांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील दोघी
अपघाताची माहिती पातोंडा गावात कळाल्यावर मोठी खळबळ उडाली. मयत शोभाबाई व कमलबाई या दोघांचे नातेवाईक मध्यप्रदेशकडे रवाना झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांचे मृतदेह घेवून नातेवाईक काही वेळाने अमळनेर या गावात पोहचत आहे. मयत शोभाबाई लुकडू पाटील, पश्चात पती एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पती शेती करतात. तर मयत कमलबाई यांच्या पश्चात पती दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. दोघांचे पती एकमेकांचे भाऊ आहेत. कमलबाई या जेठाणी तर शोभाबाई देराणी आहेत. एकाच कुटुंबांतील दोघा महिलांचा अपघाती मृत्यूने पातोंडा गाव सुन्न झाले आहे