अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सबगव्हान येथे एक वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून झालेल्या मुलामुलींच्या वादातून १४ रोजी सायंकाळी दोन गटात दंगल झाली. दोन्ही गटातील अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कसून तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश वासुदेव पाटील (रा. सबगव्हान) याने फिर्याद दिली की एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून १४ रोजी गोंधळाच्या कार्यक्रमात जेवणाच्या ठिकाणी अनिल संतोष पाटील , स्वप्नील अनिल पाटील, राजेंद्र अनिल पाटील, भटू सदाशीव पाटील, अनिलचा शालक व शालकाचा मुलगा अशा सहा जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून आडवे पाडले, काठ्यांनी मारहाण केली. तर दुसऱ्या गटातर्फे अनिल संतोष पाटील यांनी फिर्याद दिली की विश्वास वासुदेव पाटील, सागर वासुदेव पाटील, बाळासाहेब विश्वास पाटील, सुरेश वासुदेव पाटील, गणेश सुरेश पाटील यांनी रात्रीच्या भांडणाच्या वादात १५ रोजी सकाळी हातात दगड ,काठ्या घेऊन घरी आले व घराचा दरवाजा तोडला आणि मारहाण केली. दोघांच्या तक्रारीची मारवड पोलीस स्टेशनला नोंद घेऊन दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.