बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) येथील दगडी दरवाज्यावरील मांगीर बाबांची प्रतिकृती पूर्वव्रत बसवण्याचे आदेश पुरातत्व खात्याने अमळनेर पालिकेला दिले आहेत. अशी माहिती यासाठी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी दिली. तसेच यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा पत्रकार परिषदेत त्यांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्राचीन व इतिहासकालीन दगडी दरवाज्याच्या मुख्यभागावर प्राचीन काळापासून मातंग समाजाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मांगीर बाबाची मुर्ती स्थित होती,परंतु सदर दगडी दरवाजा दुरावस्थेमुळे पालिकेतर्फे पाडण्यात आला यात मागीर बाबांची मुर्तीही उतरवली गेली होती,पालिकेतर्फे दगडी दरवाज्याचे पुनर्निमितेचे काम हाती घेण्यात आल्याने ज्या बुरुजावर व ज्या ठिकाणी पूर्वी स्थित होती,त्याच ठीकाणी मांगीर बाबांची मुर्ती प्राणप्रतीष्ठा करून बसविण्यात यावी तसेच मूर्तीची जागा बदलू नये अशी विनंती होती बहुजन रयत परिषदेतर्फे करण्यात आली होती,परंतु स्थानिक पातळीवर विरोध दर्शविण्यात आला होता.
पुरातत्व विभाग नाशिक यांच्याशी पाठपुरावा
तरी बहुजन रयत परिषद व अमळनेर तालुका मातंग समाजामार्फत लढा देण्यात आला. बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी मा. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदने दिलीत. पालीकेने पुरातत्व विभाग नाशिक यांच्याशी या संदर्भांत पत्रव्यवहार केला.तसेच प्रकाश बोरसे यांनी नाशिक येथे जाऊन पुरातत्व विभागाच्या सतत संपर्कात राहून अखेर या कामी यश मिळविले. याकामी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.