अमळनेर (प्रतिनिधी) राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा आणि राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे अमळनेर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली.
नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. त्यात म्हटले आहे की, महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा कार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे… या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे.राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.दरम्यान राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी विनंती करून राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे.. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी विनंती निवेदनात आहे. सदर निवेदन देताना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सचिव चंद्रकांत पाटील तसेच जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर,पांडुरंग पाटील,संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,उमेश काटे,मुन्ना शेख,आर जे पाटील,काशिनाथ चौधरी, सदानंद पाटील,संभाजी देवरे,सचिन चव्हाण,समाधान मैराळे, दिनेश पालवे, नूरखान पठाण,हितेंद्र बडगुजर, महेंद्र पाटील,जयेशकुमार काटे,सुरेश कांबळे,युवराज पाटील,रोहित बठेजा, बाबूलाल पाटील,युवराज पाटील,जयंतीलाल वानखेडे, कमलेश वानखेडे, राहुल बहिरम यासह सदस्य उपस्थित होते.
पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय , पत्रकार संरक्षण कायदा आहे, मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.