मांडळ येथे थरकाप उडवणारी घटना, संबंधित तलाठ्याचे निलंबन का नाही ?
अमळनेर (प्रतिनिधी) महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सूरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा वाळू माफियांनी जीव घेतल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मांडळ येथे घेतली. या वाळू माफियांनी गुप्तांगावर वाळू उपसण्याचे फावड्याने वार करून अंगावर ट्रॅक्टर चालवून निर्दयीपणे हत्याचा केल्याने संतप्त कुटुंबीय आणि नातेवाईकांनी थेट मृतदेह तहसील कार्यालयात आणून जाब विचारला. तसेच दोषींना अटक करण्याची मागणी लावून धरली.
मांडळ येथील जयवंत यशवंत कोळी (वय ३४) यांचे मांडळ येथे पायकेर शिवारात शेत असून शेतशेजारी नाला आहे. ११ रोजी रात्री जयवंत व त्याची पत्नी शुभांगी शेतात पाणी भरायला गेले असता मांडळ येथील अशोक लखा कोळी (वय ५६), हा मोटरसायकल वर थांबून होता व त्याचे ट्रॅक्टर नाल्यात विशाल अशोक कोळी (२९ ), सागर अशोक कोळी (२६) , विनोद अशोक कोळी (२४ ), रोहन बुधा पारधी (२२) व पिंटू शिरपूरकर (२३) हे नाल्यातून रेती भरत होते. त्यावेळी जयवंत यांनी त्यांना रेती भरू नका, रस्ता खराब होतो म्हणून त्यांचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर परत केले होते. त्याचा राग येऊन अशोक हा द्वेषभावनेने पाहत होता. १६ रोजी रात्री ९ वाजता जयवंत शेतात मक्याला पाणी द्यायला गेला होता. १७ रोजी सकाळी सात वाजता जयवंत बनियन व निकर वर मयत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. लागलीच नातेवाईकांनी जयवंत यास खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला तातडीने धुळे येथे नेण्यास सांगितले. जयवंत यांच्या गुप्तांगावर फावड्याने मारहाण करून तोडण्यात आले होते. तसेच मान, पाय, कंबर फ्रँक्चर झाले होते. पत्नी शुभांगी कोळी हिने मारवड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी दिली आहे. त्यानुसार वरील सहा जणांनीच जयवंत याचे गुप्तांग तोडून अंगावर ट्रॅक्टर चालवून त्याचा खून केला आहे. म्हणून सहा जंनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे वृत्त कळताच एपीआय जयेश खलाने यांनी घटनास्थळी भेट दिली. डीवायएसपी राकेश जाधव यांनी हॅम्पी श्वान व पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला बोलावले. विकास वाघ, किरण चौधरी तसेच विनोद चव्हाण, शेषराव राठोड यांनी आरोपींच्या मार्गाचा मागोवा शोधला. तसेच मयताची टोपी, मफलर, कपडे यांच्यावरील रक्ताच्या डागचे नमुने घेतले.
मृतदेह आणला तहसील कार्यालयात
मृत जयवंताचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी अमळनेर तहसील कार्यालयात आणले होते. सर्व आरोपीना अटक झाल्याशिवाय मृतदेह नेणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली होती. याच आरोपीनी त्रास दिल्याने यापूर्वी जयवंतच्या भावाने आत्महत्या केली होती. त्यावेळी ते सुटून गेल्याने पुन्हा त्यांनी गुन्हा केला आहे, असा आरोप नातेवाईक करत होते. डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी मृताचा भाऊ व नातेवाईकांची समजूत काढून आरोपीना लवकर अटक केली जाईल व कोणालाच माफ केले जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
गावात पोलिस बंदोबस्त
वाळू वाफियांनी एकाचा जीव घेतल्याने गावात तणावपूर्ण शांततात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मांडळ येथे आरसीएफ पालटून व अमळनेर पारोळा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महसूल यंत्रणेचे झोपेचे सोंग !
तालुक्यात वाळू वाहतुकीला बंदी असतानाही महसूल यंत्रणेच्या कृपा आशीर्वादाने सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार मंडळ अधिकारी, तलाठी यांना हा अवैध वाळूचा प्रकार कसा दिसत नाही, मुळातच वाळूत यातील अनेकजण आपले हात ओले करीत असल्याने कानाडोळा करतात. परंतु त्यांच्या या अशा बेफिकरी वागण्याने एकाचा जीव जाऊन निष्पाप महिलेचे कुंकू पुसले गेल्याच्या पापाची जबाबदारी प्रशासन घेईल काय, असा सवाल उठत आहे. वाळूवाल्यांमध्ये भांगडी सुरू होते, हे तलाठीला माहिती नव्हते काय, त्यांनी अवैध वाळूला आळा घातला असता तर जीव गमवणाऱ्याला विरोध करण्याची वेळ आली नसती. म्हणून तलाठीला निलंबित का करू नये, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही तलाठ्यांची चक्क ट्रॅक्टर !
वाळूतून रग्गड पैसा मिळत असल्याने काही तलाठी तर वाळूतच पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे. यात काही तलाठींनी ट्रॅक्टर घेऊन अवैध वाळू वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कुंपनच शेत खात असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती अथवा सीआयडी चौकशी लावली तर सारे अंडेपिल्ले बाहेर निघून अनेकांना नोकरी गमावून घरी बसावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांचेही हात ओले ?
तालुक्यात सर्रासपणे अवैध वाळूची वाहतूक सुरू असताना केवळ चिरिमिरी घेऊन अशी वाहने सोडून देण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे वाळू माफिया बिनधास्तपणे वाळू वाहतूक करीत आहेत. मसूल यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा किडलेली असल्याने अजून वाळू माफिया किती निष्पापांचे बळी घेणार,असा संताप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.