अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील लालबाग शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सन २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कार्यकाळात पालिकेने ठराव करून लालबाग शॉपिंग सेंटर मधील ३३ गाळे धारकाना दहा फूट जादाचे बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली होती. यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. शिवसेना (ठाकरे गट) चे शहर उपप्रमुख अनंत निकम यांनी जिल्हाधिकारीनकडे तक्रार केली होती. जादाचे बांधकाम नियमबाह्य असून त्यामुळे लालबाग परिसरात वाहतुकीची कोंडी होणार होती. पार्किंगच्या नियमांची पायमल्ली होणार होती. म्हणून झालेला ठराव रद्द करून जादाचे बांधकाम पाडण्यात यावे , नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे , आणि बेकायदेशीर कामाला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निकम यांनी केली होती.यावर दोन वर्षांपासून सुनावणी सुरू होती. अखेर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हा ठराव रद्द करून जादाचे बांधकाम काढून घेण्यात यावे असे आदेश दिले. तर नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्या अपात्रतेची मागणी फेटाळण्यात आली. तर तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी करा असेही आदेश दिले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत दुजोरा दिला आहे.