दुसरा संशयित फरार होण्यात झाला यशस्वी
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी सापळा रचून अमळनेर शहरात बस स्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा पकडून एकाच्या मुसक्या आवळल्या असून दुसरा फरार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे (दोन्ही रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे) हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजा सोबत पोलिसांना आढळून आले. सुरेश साहेबराव भदाणे यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्यास यशस्वी झाला. तर राधेश्याम रामसिंग पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत. दि.23 रोजी आरोपीस अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रविंद्र पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे,पोलीस कॉन्स्टेबल हर्षल पाटील, विलास बागुल आदींनी केली. या वेळी मुडी तलाठी प्रदीप भदाणे, निलेश पवार, सागर पाटील, रोहन आठवले आदी पंच म्हणून उपस्थित होते.