खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर महाविद्यालयात बॅनर बाजीचा ‘प्रताप’

‘पोरखेळ’ नव्हे तर राजकारणाचा ‘सुडखेळ’ आजी-माजी आमदारांचा बिघडला ताळमेळ

बाबू.. यह पब्लिक है सब जानती है……

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित आमदार चषक स्पर्धेसाठी लावण्यात आलेले आमदार अनिल पाटील यांचे बॅनर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. त्यानंतर बॅनर काढून टाकल्याचे कळवल्यावर आमदार अनिल पाटील यांनी पुन्हा कार्यकर्त्यांना सांगून बॅनर उभे केले होते. शुक्रवारी हा बॅनरबाजाची महाविद्यालयात रंगलेला ‘प्रताप’कडे अनेकजन ‘पोरखेळ’ म्हणून पाहत आहेत. परंतु हा ‘पोरखेळ’ नव्हे तर आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मिता वाघ यांच्यातील ‘सुडखेळ’ असून याचा अनुभव आता अमळनेरकरांना वेळोवेळी येणार आहे. मुळात या दोन्ही आजी-माजी आमदारांनी मतदारांना “दुध”खुळा समजू नये. बाबू.. यह पब्लिक है सब जानती है……
अमळनेर मतदार संघांचे राजकारण आणि नेत्यांची भूमिका नेहमीच बुचकळ्यात टाकणारी असते. म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीत कोण निवडून येईल, हे शेवटपर्यंत सांगणे कठीण असते. याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने घेतला आहे. त्यानंतर हळूहळू त्याची गुपिते उलगडू लागतात आणि प्रत्येकजण तोंडात बोटे घालू लागतात. मागील विधानसभा निवडणुकीतही तेच घडले. आमदारकीच्या निवडणुकीला बोलताबोलता तीन वर्ष झाली आणि त्याचे पडसाद आत्ता उमटू लागले आहेत. त्याची ठिणगी बाजार समितीपासून ते दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत आणि आता थेट प्रताप कॉलेजच्या मैदानापर्यंत आल्याने आता हे असेच शह कटशहाचे राजकारण सुरू राहणार आहे.

अनिल दादांनी ठेवली नाही मदतीची जाणीव

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांना निवडून येण्यासाठी स्व.उदय वाघ आणि तत्कालीन विधान परिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ यांनी भरीव मदत केल्याचे आता काही गुपित राहिले नाही. त्यामुळे उपकाराची जाण आमदार अनिल पाटील यांनी ठेवणे सहाजिकच होते. परंतु आमदार अनिल दादा निवडूण आल्या आल्या महाविकास आघाडीची सत्ता आल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि प्रतोद म्हणून वर्णी लागली. त्यामुळे दादा सारे काही विसरून एक एक भाग पादक्रांत करू लागले. स्मिता वाघ यांच्याकडे असलेली बाजार समितीवर राष्ट्रवादीचा प्रशासक बसवून त्यांनी ती ताब्यात घेतली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दूध संघाच्या निवडणुकीत स्मिताताईंचा पराभव केला. किमान उपकाराची जाण म्हणून दूध संघ सोडला असता तर ही ठिणगी पडली नसती. त्यांनी आमदारकीत मदत केल्याने किमान अनिल दादा यांनी उपकाराची परतफेड म्हणून मदत करणे अपेक्षित होते, असे स्मिताताईसह त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. परंतु तसे न झाल्याने त्या दुखावल्या गेल्या आणि आता विरोधाला विरोध सुरू झाल्याचे दिसत आहे.

स्मिताताईंचे तीन वर्ष मौन का…?

स्मिताताई यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. खासदारकीचे आमदारकीचे तिकीट कापले गेले आणि विधान परिषदेची टर्मही संपली. किमान दूध संघावर जाता येईल, असे वाटत असताना त्यांना पराभव स्विकारावा लागला. तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाशी प्रतारणा करीत अनिल दादा यांना मदत केली होती. अनिल दादा उपकाराची जाण ठेवतील म्हणूनच त्या तीन वर्ष मौन बाळगून होत्या. तीन वर्षात त्यांनी कधीच अनिल दादांविषयी ब्र शब्द काढला नाही. मात्र बाजार समितीसह दूध संघ निवडणुकीतही त्यांना अपेक्षाभंग झाल्यानेच त्यांनी आता मौन सोडायला सुरुवात केली आहे. म्हणूनच पराभव होताहोताच भाजपचे शीतल देशमुखांनी पत्र काढून आमदारांनी आमसभा घेण्याचे आव्हान दिले. त्यानंतर शुक्रवारी प्रताप कॉलेजमध्ये बॅनरबाजीचे नाट्य रंगले. तर नगरपालिका, खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकाही जवळ येऊ लागल्याने आतापासूनच त्या तयारीला लागल्याचे दिसू लागले आहे.

अनिल पाटलांची होऊ शकते कोंडी

माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही आमदार अनिल दादा यांचे बॅनर काढण्यासाठी स्मिताताईला मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्मिताताई आणि शिरीष चौधरी एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार साहेबराव दादा हे सध्या शिंदे सेना गटाकडे आहे. दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांकरितां साहेबराव दादांनी वयक्तिक त्यांच्यासाठी एक मत मागितल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे तेही भाजपसोबतच असतील असे गृहीत धरल्यास अनिल पाटील यांच्या कोंडी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे शिरीष चौधरी, साहेबराव दादा यांची काय भूमिका असते याकडे आता विशेष लक्ष लागून आहे. त्यामुळे विद्यामान आमदाराविरुद्ध तीन माजी आमदार असे अमळनरेचे राजकारण पाहण्यास मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button