आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक, १५ तारखेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात ईदच्या पूर्वसंध्येला दोन गटात उसळलेल्या दंगल प्रकरणी आणखी दोघा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तिन्ही आरोपीना न्यायालयाने १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमच दंगलीतील अज्ञात इतर आरोपी पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून शोधले आहेत.
अमळनेर शहरात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे दंगल प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीतील नावांव्यतिरिक्त अज्ञात आरोपीही शोधून काढणे सुरू केले आहेत. गोंधळ घालणारे ,दगडफेक करणारे कॅमेऱ्यात दिसून येत असल्याने पोलिसांनी धनंजय वसंत पाटील व रियाज बागवान यांची ओळख पटवून शाह आलम नगर ,अंदरपूरा भागातून तर फिर्यादीत असलेला विशाल दशरथ चौधरी याला माळीवाडा भोईवाडा येथील नदी काठावरून अटक केली आहे. आरोपीनी इतरांची नावे सांगितल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , सहाययक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी ,पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , योगेश महाजन, रवी पाटील ,दीपक माळी , शरद पाटील यांनी रात्री उशिरा आरोपीना अटक केली होती. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्या. अग्रवाल यांनी १५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , डीवायएसपी राकेश जाधव शहरातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त व गस्त लावण्यात आली आहे.