अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) राजस्थान येथील इंद्र कुमार मेघवाल या मागासवर्गीय ९ वर्षीय चिमुरड्याच्या हत्येस जबाबदार असलेल्या जातीयवादी व्यवस्थेस खतपाणी घालणाऱ्या शिक्षकास जाहीर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानातील सुराणा गावात ९ वर्षीय निष्पाप इंद्र कुमार मेघवाल या विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली जाते ; ही अत्यंत संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तसेच अत्यंत निंदनीय अशी घटना असून या घटनेचा तीव्र शब्दात जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत. आपला देश एकीकडे स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिवस साजरा करीत असतांना पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून या देशात शिक्षकासारख्या नैतिक व मानवतावादी क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीने जातीय आकसबुद्धीने अनुसूचित जातीच्या निष्पाप चिमुरड्या इंद्र कुमार मेघवाल या मुलास निर्दयीपणे मारहाण करून त्याचा बळी घ्यावा ही अत्यंत लांछनास्पद, भेदभावात्मक घटना आहे म्हणून या घटनेची कसून चौकशी होऊन,जलदगती न्यायालयात संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. निवेदन देताना परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव, अॅड. एस. एस. ब्रह्मे, प्रा.डॉ.विजय तुंटे, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा. विजयकुमार वाघमारे सोमचंद संदानशिव, प्रा.मुकुंद संदानशिव, विजय गाढे, विजय संदानशिव, बापुराव संदानशिव, विनोद बिऱ्हाड, प्रा.माधव भुसनर, गौतम मोरे, दिनेश बिऱ्हाड, मंगल सपकाळे, धीरज ब्रह्म, तुषार संदानशीव आदी उपस्थित होते आणि त्यांच्या निवेदनावर सह्या असून अव्वल कारकून भुषण पाटील यांनी निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनाच्या प्रति या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत, गृहमंत्री, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या आहेत.