खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रभाग आठ मधील रस्त्यांची लागली वाट वाहने सोडा, पण पायी चालणेही कठीण

पालिकेने याची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी नागरिक बंद करणार रस्ता

अमळनेर (प्रतिनिधी) भुयारी गटारींच्या खोदकाममुळे शहरातील पिंपळे रोड ते धुळे रोडला जोडणाऱ्या रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. वाहने तर सोडाच पण पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात यावा अन्यथा स्वातंत्र्यदिनी आम्हीच रस्ता बंद करू असा अनोखा इशारा नागरिकांनी नगरपालिकेला दिला आहे.
शहरातील प्रभाग आठ मधील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे रोड ते धुळे रोड जोडणाऱ्या रस्ता ४० फुट रुंदीचा असून या रस्त्यावरून पुढे ठेकु रोड, पिंपळे रोड व गलवाडे रस्त्यावरील सर्व कॉलन्यांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा वावर असतो. त्याचप्रमाणे रेती, खडी, मुरूम व बाजार समितीतून जीन मध्ये जाणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ असते. पालिकेने धुळे रोडवरून या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून खूप मोठी समस्या सोडवून वाहतूकीची कोंडी सोडवली. मात्र वाहतूक चांगली सुरु झाली असली तरी या रस्त्यावर वेड्या वाकड्या पद्धतीने भुयारी गटारीचे खोदकाम झाले आहे. नियमाप्रमाणे ठेकेदाराने भूयारी गटारीच्या चाऱ्या बुजून रस्ता पूर्वी होता तसाच मजबूत करून देणे कर्तव्यप्राप्त असतांना ठेकेदाराने भूयारी गटारीची माती इतरत्र टाकून दिली. चाऱ्या व्यवस्थित न बुजल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. परिणामी नागरिकांना त्या रस्त्यावर धड चालता येत नाही. अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिका, जीवन प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करीत आहे. भुयारी गटार व रस्त्याचे काम होई पर्यंत हा रस्ता वाहतूकीसाठी व कायमचा बंद करण्यात यावा. अन्यथा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आम्ही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करू यास प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विवेक पाटील, संजय पाटील, आकाश बोरसे, राजेश बोरसे, प्रवीण पाटील, विजय भदाणे, एस. व्ही. पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, पुंडलिक पाटील, गिरधर पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, विश्वेश पाटील, निंबा पाटील, संभाजी पाटील, किशनराव पाटील, विकास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

झोपी गेलेला कुंभकर्ण नगरसेवक

ज्या प्रभागातील नागरिकांनी आपल्याला निवडून दिले. त्याच नागरिकांच्या हालअपेष्टा आखोदेखील असतनाही नगरसेवकाने पाच वर्ष नगरपालिकेत काय बोंब पाडली असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पाच वर्ष सत्तेत राहूनही काम करता आले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने आता पुन्हा नागरिकांच्या घरी मते मागण्यासाठी येतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाच वर्ष कुंभकर्ण झोपी गेलेल्या नगरसेवकाला नागरिकांच्या समस्यांची जाणीवच झाली नाही, हे यावरून स्पष्ट दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button