पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येपासून अमळनेरकर नागरिकांची होणार सुटका
अमळनेर (प्रतिनिधी) यंदा मान्सूनला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पिंपळे रोड आणि ढेकू रोड परिसरात साचणाऱ्या पाण्यापासून आणि नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पालिकेने नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे. यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येपासून नागरिकांची सुटका होणार आहे.
शहरातील कॉलन्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होत होते. तसेच नदी प्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ही खोळंते. मंगरूळ शिवारातून धुळे रोड कडून शेत शिवारातील पाणी वाहून येत असते. काही लोकांनी या नाल्याला बांध घालून ठेवल्याने पाणी कॉलन्यांकडे वळत होते. म्हणून प्रशासक सीमा अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण , संतोष बिऱ्हाडे , अरविंद कदम यांनी शहर हद्दीबाहेरून आरके पटेल कारखान्याच्या मागील बाजूकडून ,शेतकी संघ च्या बाजूने येणारा नाला स्वच्छ करणे सुरू केले आहे. तसेच पिंपळे रस्ता ,ढेकू रस्ता या भागातील पिंपऱ्या नाला , मोठ्या गटारी यांचा गाळ काढून खोलीकरण सुरू केले आहे. यामुळे पावसाळ्यात कचरा अडकून न राहता नाल्यातून पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल. नाल्यात येणारी अतिक्रमणे, अडथळे देखील काढले जात आहेत.
पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करा
शहरातील अनेक लोकांनी नाल्यावर पायऱ्या, पाईप, अडथळे टाकून ठेवले आहेत. त्यामुळे प्रवाहस अडचण निर्माण होते. म्हणून त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे आणि पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे.
– प्रशांत सरोदे ,मुख्याधिकारी ,अमळनेर