माजी नगरसेविका कमलबाई पाटील, विश्वनाथ पितांबर पाटील यांनी दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) नाल्यांचे पाणी कॉलनी भागात शिरू नये याकरीता माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच विश्वनाथ पितांबर पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्याना निवेदन देऊन पिंप्राळा नाल्यावर कॉटन मार्केटच्या मागे जुन्या छोट्या पूला ऐवजी नवीन मोठा पूल बांधावा, अशी मागणी केली आहे.
पाटील दांपत्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या हद्दीतील आर.के.नगर, भालेराव नगर, गूरूकूपा कॉलनी, प्रसादनगर, संताजी नगर आदी भागात पावसाळ्यात नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकाच्या घरात तसेच आजूबाजूला परिसरात शिरते व मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरते. तसेच तेथील नागरिकांचा अमळनेर शहराशी संपर्क तुटतो. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून अमळनेर नगरपरिषदेच्या दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पिंप्राळा नाल्यावर कॉटन मार्केटच्या मागे जुन्या छोट्या पूला ऐवजी नवीन मोठा पूल मंजूर केला असून त्यांचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे. तसेच पाण्याला अडथळा निर्माण करणारे नाल्यातील अतिक्रमणासह काटेरी झाडे झुडपे काढून नाला खोल करण्यात यावा व या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी केली आहे.