अतिक्रमण केले नसून गुरे डुकरे, चोरीपासून संरक्षणसाठी पत्रे आडवे लावल्याचा खुलासा
अमळनेर (प्रतिनिधी) व्यापारी प्रेमकुमार रतीलाल शहा यांनी धुळे रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केले नसून गुरे डुकरे ,चोरी पासून संरक्षण मिळावे म्हणून पत्रे आडवे लावले असा खुलासा केला आहे. तर पालिकेने ४० वर्षात सर्वेक्षण करून वारंवार मागणी करूनही रस्ता केला नसल्याचे खापर नगरपालिकेवर फोडले आहे. त्यामुळे पालिकेने विलंब न करता ताबडतोब रस्ता मोकळा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
धुळे रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच बंद आहे. त्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रोड वासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी हा रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. अनेक वर्षे रस्ता बंद करून व्यापाऱ्याने पालिकेवर खापर फोडले आहे. तर शहा यांनी उलट आमचे मालकी क्षेत्रफळ मोजून रस्त्याचे काम जरूर मार्गी लावावे अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
चोपडा धुळे राज्य मार्गाला जोडणारा पूजा ऑइल मिल जवळील हा रस्ता असून तो शहराच्या ढेकू रोड ,पिंपळे रोड , गलवाडे रस्ता आणि या भागातील सर्व कॉलन्यांना जोडणारा गट नंबर १४९९/१ अ व ब मधील मुख्य रस्ता आहे. सदर नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण संबंधीत १२ मीटर रस्त्यावर केलेले नाही. मागील ४० वर्षात नगरपरिषद कार्यालयाकडून ४ ते ५ वेळा या स्थळाची सर्वे/ पाहणी झाली. आहे.प्रत्येक पाहणी व सर्वेक्षण झाल्यानंतर आम्ही आपल्या कार्यालयीन अधिकाऱ्यांना सदर रस्त्याचे मोजमाप व आखणी करुन रस्ता लवकर बनविण्यात यावा याची वेळोवेळी मागणी करत आलो आहे.
रस्त्याचा मोबदला दिला नसल्याचा आरोप
१२ मीटर रस्ता हा आमचे मालकीचे क्षेत्र १२९९/अ व १४९९/१/मधून नगररचना विभागाने टाकला असुन त्या रस्त्याच्या क्षेत्रफळाच्या भरपाईपोटी आम्हास आजवर कुठलाही मोबदला नगररचना विभागाकडून मिळालेला नाही,उलट आमचे मालकी क्षेत्रफळ मोजून मापून सदर रस्ताचे काम मार्गी लावावे अशी विनंती करत पावसाळ्यात याभागात पाणी तुंबत असल्याने बस स्टँड व बाजार समिती समोरील अतिक्रमण ,धुळे रोडवरील सर्व्हिस रोड वरील अतिक्रमण देखील काढण्यात यावे अशी मागणी देखील शाह यांनी केली आहे.