अमळनेर (प्रतिनिधी ) येथील सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानतर्फे प.पू.उद्धव महाराज मुल्हेर यांचा त्रिशताब्धी महोत्सव व प.पू.गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.23 फेब्रुवारीपासून दत्तयाग , श्रीमद्भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह सुरू आहे.
वाडी संस्थानचे गादीपती प.पू.प्रसाद महाराज यांनी हा महोत्सव आयोजित केला असून दि.1 मार्च पर्यंत हे धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. दि.2 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान नाशिक येथील ह.भ.प.श्री माधवदास महाराज राठी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. दि.23 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत यज्ञाचा कार्यक्रम होत असून यज्ञाचे मुख्य यजमान वसंतराव व मंगल जोशी, मनोज व अमृता जोशी, मिलिंद व रुपाली जोशी तर यज्ञाचार्य म्हणून यज्ञभूषण हेमंत धर्माधिकारी (नाशिक), केशव पुराणिक आहेत. यात दररोज 20 भाविक सहभागी होत आहेत. तसेच दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत श्रीमद्भागवत कथा कार्यक्रम होत असून कथा प्रवक्ता म्हणून श्री क्षेत्र नाशिक येथील भागवताचार्य वेदमूर्ती अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे लाभ देत आहेत, तर दररोज रात्री साडे आठ ते साडे दहा दरम्यान नामांकित किर्तनकारांचा कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. तसेच दररोज सकाळी 8 ते 12 कोमलसिंग बुवा व शारंगधरबुवा यांचे ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होत असून दररोज सुमारे 350 ते 400 च्या वर महिला व पुरुष भाविक याचा लाभ घेत आहेत.
परिसर विद्युत रोषणाईने उजळला
सदर सर्व कार्यक्रम वाडी संस्थानचे मंदिर, नदी पात्रातील समाधी मंदिर आणि कुटीमध्ये होत असून महोत्सवानिमित्त सर्व परिसर विद्युत रोषणाई केली आहे. अजून तीन दिवस महोत्सव सुरू असल्याने सर्व भाविकांनी दर्शन व कीर्तन तसेच इतर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प.प्रसाद महाराज व सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानतर्फे करण्यात आले आहे.