लहान मुलांचे मागील भांडण उकरून एक महिलेसह कुटुंबाला मारहाण
पाडसे येथे अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा केला दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) लहान मुलांचे मागील भांडण उकरून एक महिलेसह तिचा पती मुले व बहिणीला मारहाण करून जखमी केल्याची घटना २१ रोजी रात्री ८ वाजता तालुक्यातील पाडसे येथे घडली. याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाडसे येथे आधार शिरसाठ यांचे गौतम चिंतामण गव्हाणे यांच्याशी लहान मुलांच्या खेळण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. आधार शिरसाठ यांची पत्नी मुले व आपल्या बहिणीसह २१ रोजी रात्री ओट्यावर बसली असतांना गौतम चिंतामण गव्हाणे , अनिता गौतम गव्हाणे , आकाश उर्फ गटल्या देविदास गव्हाणे , राहुल देविदास गव्हाणे , सरलाबाई भैय्या गव्हाणे , रत्नदीप भैय्या गव्हाणे ,सुशीलाबाई चिंतामण गव्हाणे ,चिंतामण शंकर गव्हाणे , कल्पनाबाई देविदास गव्हाणे , दीपाली देविदास गव्हाणे हे सर्व हातात लाठ्या, काठ्या, दगड घेऊन अंगणात येऊन शिवीगाळ व मारहाण करू लागले. महिलेचा मुलगा प्रदीप याबाबत जाब विचारला असताना त्यांनी महिलेच्या पाठीवर ,पायावर काठ्यांनी मारहाण केली. तर आकाशने महिलेची बहीण लिलाबाई हिला दगड फेकून मारला. तो दगड तिच्या डोळ्यावर व कपाळावर लागल्याने रक्तस्राव होऊ लागला. त्यांनतर सर्वांनी पती आधार व मुलगा प्रदीप याना खाली पाडून छातीवर, पोटावर व डोक्यावर लथाबुक्क्यांनी मारहाण केली. दवाखाण्यात उपचार घेतल्यानंतर उशिराने मारवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून अकरा जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भरत गायकवाड करीत आहेत.