‘खाशि’च्या निवडणुकीसाठी नेटाने लढताय, म्हणूनच कल्याण पाटील वरचढ ठरताय !
निवडणूक न घेण्याचा विरोधकांचाच डाव, कल्याण पाटलांनी मर्मावरच घातला घाव
सहकाराचे ‘कल्याण’, पाठीशी पत्नी ‘राजश्री’ म्हणून कल्याण पाटीलच होणार ‘विजयश्री’
सत्ताधाऱ्यांचा पुन्हा निवडणूक हाणून पाडण्याचा डाव, आज होणार सुनावणी
अमळनेर (खबरीलाल विशेष) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ऐन रंगात आली असताना कोरोनाच्या आड जिल्हाधिकाऱ्यांनी बोट ठेवल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक व्हावी म्हणून सहकार पॅनलचे कल्याण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेटाने लढा दिला. त्यात पुन्हा एका फेलोने टाकलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात कामकाज होणार असून त्यालाही कल्याण पाटील यांचे वकिल अॅड. भरत वर्मा हे निवडणूक होण्यासाठी क्रॉस करणार आहे. हाही सत्ताधाऱ्यांचाच डाव असल्याने कल्याण पाटील त्यांच्यावर वरचढ ठरू पाहताय. म्हणून त्यांनी खाशिची निवडणूक होण्यासाठी कसा लढा दिला, काय पापड पेलले, त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांना कोणी साथ दिली, याचा उहापोह खबरीलालने जाणून घेतला असता, ही निवडणूक थांबवण्यासाठी कशी कुटनिती केली गेली, केली जात आहे, याचे गौप्यस्फोट त्यांनी केले. म्हणून आपण केलेला संघर्षामुळेच ही निवडणूक लवकर लागली असल्याचा आनंद व्यक्त करीत मतदारांचा भक्कम पाठींबा आणि पत्नी “राजश्री”च्या साथीने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. प्रचार शिगेला पोहचला असल्याने ही निवडणूक पुन्हा लवकर होण्यामागे कल्याण पाटील हे किंगमेकर ठरत आहेत. त्यांनी ‘खबरीलाल’शी संवाद साधताना सांगितले की, ‘खाशि’चे विसर्जन आणि प्राचार्या राणे मॅडमच्या प्रकरणावरून सत्ताधारी आशीर्वाद पॅनल अडचणीत आले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, ही निवडणूक जिंकणे सोपे नसल्यामुळे त्यांच्याकडून निवडणूक रद्द करण्याचे कुभांड रचले गेल्याचा सनसनाटी आरोपही कल्याण पाटील यांनी केला आहे.
पुन्हा कोर्टात लढण्यासाठी तयार
फेलो गोकूळ भिका पाटील यांनी आठ मतदानाच्या ठरावाविरोधात खंडपीठात ५ जानेवारी रोजी wp/296/2022 क्रमांकाने याचिका दाखल करून निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. खाशिच्या निवडणुकीत आठ मतदारांची जबरदस्ती कशी करू शकता, या मुद्द्यावर याचिका दाखल केली आहे. त्यावर आज शुक्रवारी न्या. गंगापूरवाल्यांकडे सुनावणी होणार आहे. याला कल्याण पाटील यांच्याकडून अॅड. भरत वर्मा बाजू मांडून क्रास करणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून ती कंटीन्यू झाली पाहिजे. कोणतीही तांत्रिक अडचण नाही, कयद्याने प्रोसेस पूर्ण झाली आहे. रितसर ठराव, धर्मादायक आयुक्तांची परवानगी आहे. उद्या परवा मतदान आहे, अशी भक्कम बाजू ते मांडणार आहे. तर याही याचिकेतून ही निवडणूक प्रक्रिया हाणून पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. तो पूर्ण होऊ देणार नाही, असेही कल्याण पाटील यांनी सांगितले.
निवडणूक होण्यासाठी कल्याण पाटलांचा दिवसरात्र संघर्ष सुरूच
कल्याण पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांना निवडणूक जड जाऊ लागली होती म्हणून त्यांनी निवडणूक थांबवण्याचा डाव आखला होता. त्यानुसारच प्रशासनाने कागदी घोडे नाचवत बरोबरच निवडणुकीवर घाव घातला. परंतु त्यांच्या मर्मावरच घाव घालण्यासाठी थेट खंडपीठात धाव घेतली, अवघ्या काही तासात कागदपत्रे गोळा करीत सहकारी हेमंत पवार, प्रसाद शर्मा बाळू कोठारी, अॅड. शकील काझी यांच्यासह सायंकाळपर्यंत औरंगाबद गाठले. रात्रभर जागून अॅड. भरत वर्मा यांच्यासह अॅड. काझी यांच्या मदतीने याचिका तयार केली दुसऱ्या दिवशी अॅड. वर्मा यांच्या मार्फत ती खंडपीठात दाखल केली. जलद गतिने त्याच्यावर कामकाज झाले. त्याचेच फलित म्हणून ही निवडणूक लवकर लागली आहे. त्यामुळे हा संघर्ष खाशिच्या मतदारांनी माझा संघर्ष जवळून पाहिला आहे. यात त्यांनाही मतदानाचा अधिकार माझ्यामुळे बजावता येणार असल्याने ते निश्चितच माझे ही “कल्याण” करतील असा विश्वास आहे.
सडेतोड आणि स्वाभीमानी व्यक्तिमत्व
आर.के. कंपनीचे एस.के.पाटील हे कल्याण पाटील यांचे वडील होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच मतदार एक मत त्यांना टाकतातच. तर कल्याण पाटील यांनी खाशित संचालक म्हणून या आधी काम केले आहे. नेहमीच ते स्वाभिमाने राहिले आहेत. त्यांनी चुकीच्या कामाला नेहमीच सडेतोड विरोध केला आहे. तर चांगल्या कामाला नेहमीच पाठींबा दिला. आहे. त्यामुळे सडेतोडच आणि स्वाभीमानी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची मतदारांना खास ओळख आहे. त्याचा फायदा त्यांना आता निश्चितच होणार आहे.
पत्नी राजश्री पाटील पाठीशी खंबीर उभ्या
कल्याण पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचेही अमळनेरात सोशल वर्क मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्याशी हजारो महिला जुळलेल्या आहेत. त्यांच्या नावातच ‘राज’श्री आहे. मुळात राजकारण आणि समाजकारणाचे “बाळकळू” त्यांना घरातून मिळाले आहे. म्हणून पती कल्याण पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्याही मेहनत घेत आहेत. म्हणून याचा मोठा फायदा कल्याण पाटील यांना होणार आहे. दोघेही मतदारांच्या नेहमीच संपर्कात आहे. खरे तर कोणत्याही यशस्वी पुरुषमागे महिला असते. ही ब्रीद पत्नी राजश्री पाटील यांच्यामुळे सत्यात उतरेल, यात तीळमात्र शंका नाही, असे मतदारांना वाटू लागले आहे.
निवडणूक स्थगितीचा ‘अर्थ’पूर्ण डाव ः अॅड. शकिल काझी
खाशिची निवडणूक गेल्याच महिन्यात होऊन गेली असती परंतु कोरोना संसर्गाचा आधार घेत कायद्याचा ‘अर्थ’पूर्ण वापर करीत या निवडणुकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सत्ताधाऱ्यांनी ब्रेक लावल्याचे अॅड. शकिल काझी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशावर स्पष्ट करीत सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी २० जानेवारी रोजी आदेश काढून भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यास मनाई आदेश काढण्यात आले. या निवडणुकीत कोरोना पसरणार नव्हता का? कोरोना ऐवढा हुशार होता की, फक्त शैक्षणिक निवडणुकीने तो पसरणार होता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी खाशिला ब्रेक लावला ? त्यावेळचे कोरोना रिपोर्ट पाहिले तर २० जानेवारी रोजी रिकव्हरी दर ९८.१८ होता. अमळनेरात केवळ १२ रुग्ण असताना एकूण १०१, भुसावळात ९२७, चाळीसगावात १८० रुग्ण होते. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी ‘खाशि’ला पत्र देऊन कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक घेणे उचित होणार नाही, असे संदिग्ध पत्र दिले आणि तेथून निवडणूक रद्दचा ‘डोंबारी’ खेळ सुरू झाला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ रोजी खंडपीठात सहा.अभियोक्ता ज्ञानेश्वर काळे यांना बाजू मांडण्यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यास मनाई आदेश काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे या निवडणुका होतील, त्यांच्या मिरवणुका निघतील, गुलाल उधळला जाईल तेव्हा कोरोना पसरणार नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांचे कोणते ‘लॉजिक’ आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. याचाच ‘अर्थ’ काहीही करून ‘खाशि’ची निवडणूक स्थगित करण्याचा हा डाव होता, असेही अॅड. काझी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करता, कायद्याचा कोणता ‘अर्थ’ लावता, हे प्रश्न चिन्ह निश्चितच निर्माण झाले आहे.