मतदरांना मिळणाऱ्या ‘गुलकंद’वरच उमेदवार ठरणार खरा ‘विजयानंद’
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ब्रेक के बाद पुन्हा कंटिन्यू सुरू झाली असून १३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमके कुणाला भरभरून मतांचे प्रेम देतात, हे दुसऱ्या दिवशी नेमके व्हलेंटाईन डे च्या दिवशी उलगडणार आहे. त्यामुळे उमेदवार मतदरांना कसा प्रेमाचा ‘गुलकंद’ देतात त्यावरच त्यांचा ‘विजयानंद’ ठरणार आहे.
गेल्याच महिन्यात खाशिची निवडणुकी सुरू होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अवघ्या चार दिवसांवर मतदान आले असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ब्रेक लागला होता. त्यावर सहकार पॅनलचे उमेदवार कोर्टात गेल्याने ही निवडणूक जिथून थांबली आहे, तेथून कंटिन्यू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियम पाळत निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार खाशिचे अध्यक्ष अनिल कदम यांनी मंगळवारीच निवडणूक प्रकिया राबवण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार १३ रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी लगेच १४ रोजी मतमोजणी होणार आहे.
आशीर्वाद आणि सहकारातच सरळ लढत
ही निवडणूक विद्यमान संचालकांचे पॅनल आशीर्वाद आणि विरोधक सहकार पॅनलमध्येच खरी लढत होत आहे. दोन्ही पॅनलने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून मतदारांना आकर्षिक करीत आहेत. आता अवघे चारच दिवस उरल्याने दोन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून प्रचाराचा वेग वाढवला आहे.
“लस”वंत असेल तरच करता येईल मतदान
दरम्यान मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी व आधारकार्ड सोबत आणने बंधनकारक करण्यात आले आहे. डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसले तर मतदान करण्यास प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. याबाबतची नोटीसही खाशिच्या अध्यक्षांनी काढली आहे.
मतदारांना ‘खाशि’च्या ‘खाकी’ पाकिटची प्रतीक्षा
खाशिची निवडणूक ही दर तीन ते चार वर्षांनी होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्याप्रमाणवर उलाढाल होत असते. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने ते निवडणुकीची अतुरतेने वाट पाहतात. कारण एक एक मतदार हा विजयासाठी महत्वाचा असल्याने मतांचे कुबेर नाराज होऊ नये म्हणून त्यांना लक्ष्मी दर्शनाची संधी उमेदवारांकडून दिली जाते. विशेष म्हणजे खाशिच्या या लक्ष्मी दर्शनाची संधी ही खाकी पाकिटातून होत असल्याने निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने मतदरांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.