मुडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

संस्थेचे आजीव सभासद सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

अमळनेर (प्रतिनिधी) संस्थेच्या घटनेच्या नियमांचा भंग करून तज्ज्ञ संचालक नियुक्त केल्या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मुडी येथील  ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व तहहयात संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. वाय. जे. वळवी यांनी दिले आहेत, अशी माहिती संस्थेचे आजीव सभासद सुनील राजधर पाटील पत्रकार परिषदेत दिली.
पाटील यांनी सांगितले की, ग्रामविकास संस्थेच्या घटनेनुसार २०१५ मध्ये कार्यकारी मंडळाची निवड पाच वर्षकरिता झाली असून त्यात उदय नारायण पाटील हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.  संस्थेचे दप्तर नियमाप्रमाणे संस्थेचे सचिव सुनील पंढरीनाथ पाटील यांच्याकडे आहे. संस्थेच्या घटनेमध्ये तज्ञ संचालक व प्रभारी अध्यक्ष नेमण्याची तरतूद नसताना सचिव सुनील पाटील व तहहयात संचालक रमेश विनायक पाटील यांनी पी. पी. सूर्यवंशी यांची तज्ञ नेमणूक करून घेतली आणि त्यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.  तिघांनी संस्थेचे  लेटर पॅड छापून त्याचा वापर करीत आहेत. याबाबत संस्थेचे आजीव सभासद सुनील राजधर पाटील  यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. म्हणून सुनील राजधर पाटील यांनी अमळनेर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सी आर पी सी कलम २०२ प्रमाणे चौकशीचे आदेश दिले होते. मारवड पोलिसांचा अहवाल आल्यानंतर न्यायालयाने प्रभारी अध्यक्ष पी. पी. सूर्यवंशी , सचिव सुनील पंढरीनाथ पाटील , तहहयात संचालक रमेश पाटील यांच्याविरुद्ध भादवी कलम ४२० ,४६८ , ४७१ व ३४ प्रमाणे संगनमताने  फसवणूक आणि कागदपत्रात फेरफार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असेही सुनील पाटील यांनी सांगितले.सुनील पाटील पुढे म्हणाले की, आजपावेतो उदय नारायण पाटील हेच अध्यक्ष असून त्याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट देखील सादर केलेला नाही. त्यामुळे प्रभारी अध्यक्ष व तज्ञ संचालक हे पद बेकायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *