संपर्कातील ३४ जणांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या निगेटिव्ह तर १६ जणांची केली आरटीपीसीआर
खबरीलाल– अमळनेर (प्रतिनिधी ) शहरात राजस्थानातून घरी आलेला जवान पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांचा डेल्टा किंवा ओमायक्रॉन चाचणीचा अहवाल आलेला नाही. तर संपर्कातील ३४ जणांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या निगेटिव्ह आल्या असून १६ जणांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. त्याचाही अहवाल येणे बाकी आहे.
शहरातील बीएसएफचा जवान राजस्थान मधून घरी परत आलेला आहे. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तरीही कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. मात्र तीव्र लक्षणे जाणवली नाहीत. दरम्यान ते शिरपूर येथे लग्नाला गेल्याचे समजते. डॉ. विलास महाजन व त्यांच्या पथकाने त्यांचे कुटुंबीय ,निकटवर्तीय आदींच्या ३४ जणांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी १६ जणांच्या आर टी पी सी आर चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन तीन दिवसात त्याचे अहवाल प्राप्त होतील.
ढिलाई नको, प्रशासन सतर्क हवे
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने कालच जिल्हाधिकारींनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. नागरिकांसह प्रशासनाने देखील त्याचे व कोविड नियमाचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. गेल्या वेळी प्रशासनाच्या काही ठिकाणी ढिलाई पणामुळे इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. सार्वजनिक, गर्दीचे कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यावर बंदी आणणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्या चाचण्या करून घेणे अनिवार्य आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करू
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात नियमांचे पालन ,मास्क सक्तीचा असावा. नियमांचे पालन न झाल्यास गुन्हे दाखल होतील.
-सीमा अहिरे ,प्रांताधिकारी , अमळनेर