
महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या समजुतदारीचे तालु्क्यातून कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथे शेती वहिवाटीवरून उद्भवलेला वाद सोडवण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी शेतातच बैठक मारून शेतकऱ्यांची समजूत काढली. यामुळे वहिवाटीचा वाद मिटून अन्य दोन महिलांनाही मागणी न करताच वहिवाट मिळाल्याने महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या समजुतदारीचे तालु्क्यात कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जैतपीर शिवारात गट नंबर १७६/१ मधील वहिवाटीसाठी अजबसिंग भिका पाटील यांनी पंकज मच्छीन्द्र पाटील, अभिमन भीमसिंग पाटील याना प्रतिवादी करून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर १५ रोजी स्थळ निरीक्षण ठेवण्यात आले होते. महसूल विभागातर्फे सुधीर गरूडकर आणि तलाठी विकास परदेशी, वादी, प्रतिवादी यांच्यासह संतोष रूपंचांद पाटील, शेषराव दयाराम पाटील ,गणेश विठ्ठल पाटील ,मच्छीन्द्र श्रीराम पाटील, विक्रम साहेबराव पाटील, वसंत साहेबराव पाटील, रवींद्र रामचंद्र पाटील, विजय रमेश पाटील, तुकाराम पुंडलिक पाटील, सचिन मच्छीन्द्र पाटील आदी स्थळ पाहणीसाठी उपस्थित होते. या वेळी तालुका दंडाधिकारी मिलिंद वाघ यांनी शेतातच बैठक मारून शेतकऱ्यांची समजूत घातली. वाद करण्यापेक्षा समजोत्याने वहिवाट उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. सर्व शेतकऱ्यांनीही संमती दाखवून जागेवरच लेखी संमती दिली. त्यात पुढील दोन महिला शेतकऱ्यांनी मागणी केली नसतानाही तहसीलदार मिलिंद वाघ यांनी विनंती करून त्यांनाही वहिवाट उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ती विनंती शेतकऱ्यांनीदेखील मान्य केल्याने महसूल विभागासह शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.