
पातोंडा सोसायटीच्या निडणूक पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) कधीही शेती अथवा शेती पूरक कर्ज न घेणाऱ्या तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी सोसायटीतील १६३ सभासदांना निवडणूक मतदार यादीतून वगळण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदार यादीतील अनुक्रमांक ७४८ ते ११४४ पर्यंतच्या सभासदांनी गेल्या पाच वर्षात कर्ज घेतले नसल्याने त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी किशोर राजाराम पाटील यांच्यासह इतर सहा जणांनी हरकत घेतली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी झाली. सुनावणीस सहकार अधिकारी व्ही. एम. जगताप, सचिव राजेंद्र जगन्नाथ वाणी, किशोर पाटील, अनिल गंगाराम पाटील, रमेश देवाजी पाटील व त्यांचे वकील अॅड. आर. डी. बर्डे उपस्थित होते. सुनावणी दरम्यान २३४ सभासदांनी पाच वर्षांपूर्वी शेती कर्ज घेतले होते व त्यांचे शेअर्स जमा असल्याने त्यांना मतदार म्हणून यादीत कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र सभासद झाल्यापासून एकदाही कर्ज न घेतलेल्या १६३ सभासदांना मतदार यादीतून वगळण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बिडवाई यांनी दिले आहेत.