पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची कारवाई, संघटीत गुन्हेगारीचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालक, चालकासह दोन खबरींच्या रंगेहात मुसक्या आवळत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथकाने तालुक्यातील हिंगोणे शिवारात मोठी कारवाई केली. तर याप्रकरणी संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केल्याने वाळू माफियांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नव्याने रुजू झालेल्या पोलिसांना घटनास्थळी जाऊ कारवाईचे आदेश दिले दिले होते. त्यानुसार १२ रोजी पहाटे हेडकॉन्स्टेबल अरुण बागुल , समाधान पाटील , सागर साळुंखे , रोहिदास आगोने , फारुख शेख यांच्या पथकाने हिंगोणे शिवारात छापा टाकला असता त्यांना गजानन श्रावण ठाकूर, राज गजानन ठाकूर हे दोघे भ्रमणध्वनीवरून काही लोकांना माहिती देताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ट्रॅक्टर मालक व चालकाना माहिती पुरवत असल्याचे सांगितले. त्यांचाच आधार घेऊन पोलिसांनी नदी पात्रात जाऊन कारवाई केली. या वेळी चालक किसन भिल हा वाळूने भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून पळून जात असताना आढळला त्याने आपल्या मालकाचे नाव प्रमोद उर्फ भैय्या सुभाष महाजन असे सांगितले. पोलिसांनी चौघांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर चोरी तसेच संघटित गुन्हेगारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.