नगरसेवक शाम पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिले शिल्प
अमळनेर(प्रतिनिधी) नगरसेवक शाम पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले भक्ती-शक्ती शिल्प आणि नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील श्रीराम नगर भागातील विविध विकासकामांचे २२ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे.
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील ढेकू रस्त्यावरील श्रीराम नगर जवळील खुल्या भूखंडावर नगरसेवक, आरोग्य सभापती तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांच्या संकल्पनेतून संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्ती-शक्ती शिल्प तसेच लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिका उभारण्यात आलेली आहे. या विकासात्मक कामांचा उद्घाटन सोहळा होत आहे. या कार्यक्रमाला आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या विकासकांमुळे ढेकू रस्त्याच्या सुशोभिकरणात मोठी भर पडणार आहे. तर नगरसेवक श्याम पाटील यांची नगरसेवकपदाची ही पहिली टर्म आहे. परंतु पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी डोळ्यात भरेल अशी विकास कामे केली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळाही दिमाखात होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे प्रभागातील नागरिकांसह अमळनेकरांचे लक्ष लागून आहे.