दहीवद येथील दुर्दैव घटना, शेतकरी कुटुंबावर शोककळा
अमळनेर (प्रतिनिधी) पोटाच्या पोरांप्रमाणेच जपलेल्या सर्जा राजाला पोळ्यासाठी सजून धजून पुरणाच्या पोळीचा नैवद्य खाऊ घातल्यानंतर विश्रांतीसाठी निंबाच्या झाडाला बाधंले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पावसात विजेचा कडकडाट होऊन एका बैलावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील दहिवद येथे सोमवारी सायंकाळी घडली. सजून धजून मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या बैलाल पाऊन शेतकऱ्याचे आणि त्याच्या कुटुबींयांचे काळीज चर्र झाले आणि त्यांचा आश्रूंचा बांधही फुटला.
दहीवद येथील रहिवासी आबा हरी माळी यांनी पोळ्याचा सण असल्याने त्यांनी आपल्या बैलजोडीला सकाळी चारा खाऊ घालून त्यांना चांगलेच सजवले होते. वर्षानुवर्ष शेतात राबवत साथ दिल्याने त्यांची कतज्ञता व्यक्त करीत दुपारी घरी बैल पोळा असल्याने पूजनासाठी आणले. यानंतर त्यांनी दहीवद टाकरखेड़ा रस्त्यावर असलेल्या शेतात निंबाच्या झाडाला बैल बांधले आणि चारा टाकला. मात्र सायंकाळी पाच वाजता झालेल्या पावसाने जोरात विज कडाडली. यात एक बैल थोड्या अंतरावर होता. यात एका बैलावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील, तलाठी एस.बी. पंचभाई, कोतवाल प्रदीप देसले यांनी पंचनामा केला. पोळयाच्या दिवशी शेतकरी राजावर आसमानी संकट आल्याने त्याला अश्रु अनावर झाले होते. सदयस्थितित सुरू असलेल्या हंगामात बैलाचे विज पडून ठार झाल्याने आबा माळी यांचे सुमारे पंचेचाळीस हजारांचे नुकसान झाले असून कुटुंबातील सदस्यच गेल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली होती.