तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी ; आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी) तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी ग्रामसेवकांनादेखील देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसेवकांना देखील स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावत यांनी दिली.
अमळनेर येथील पंचायत समितीच्या सानेगुरुजी सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावत बोलत होते.
अचानक आलेल्या या आपत्तींमुळे नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. मात्र अशी परिस्थिती येऊच नये व जर अशी आपत्ती आली तर त्यातून कसा मार्ग काढायचा, आपत्ती पूर्व तयारी, आपत्ती दरम्यान तयारी व आपत्ती नंतर तयारी याबाबत प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपत्तीच्या बाबतीत अनुभव सांगितले.
त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावत यांनी पीपीटीद्वारे आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सर्व तलाठी वर्गाची कार्यशाळा घेतली. त्यासंदर्भात कामांची विभागणी कशी करावी. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांचे दूरध्वनी क्रमांक, रुग्णवाहिका तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, संबंधित गावाचे सरपंच, शिक्षक, पोलीस पाटील, संबंधित भागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक व नावे, तापी, बोरी, पांझरा अशा नद्यांच्या काठावरील गावांची यंदा आलेली आपत्ती सर्व माहिती गोळा झाली आहे. त्यामुळे यंदा ओढवलेल्या संकटाचा देखील यावेळी उहापोह झाला.यानंतर केवळ आपत्ती व्यवस्थापन जबाबदारी तलाठ्यांवर न देता ग्रामसेवकांना देखील यात सहभागी करावे जेणेकरून तलाठी वर्गाचा भार कमी होईल म्हणून ग्रामसेवकांना देखील स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यंदा पांझरा नदीला मोठा पूर आलेला असतांना तहसिल विभागाचे साहित्य सापडत नव्हते. यापूर्वी जिल्हा कक्षाकडून साहित्य देण्यात आले होते. मात्र ते सापडत नव्हते. त्यावेळी साहित्य ठेवण्यात आलेली खोली मी पाहिलेली होती ती उघडली असता खूप साहित्य सापडले अशा गोष्टी टाळाव्यात साहित्य नेहमी नजरेसमोर राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन रावत यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापनात या बाबींचा होतो समावेश
पाणी आणि वातावरणाशी निगडीत आपत्ती – पूर आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, चक्रिवादळे, तुफान, वादळे, गारपीट, ढगफुटी, मेघगर्जना आणि वीज कोसळणे, बंधा-यांचे फुटणे, मोठया इमारती कोसळणे, विद्युत अपघात आणि आग लागणे यावर उपाययोजना करता यावी यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे, नियंत्रण कक्षाची स्थापना करणे.
डोंगरमाथ्यावर, नदीकाठी बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे साहजिकच आहे. जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याने रस्ते बंद झाले. इमारती कोसळल्या आणि मोठी जीवित व वित्तहानी झाली. नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो त्यामुळे वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते. पुराची पूर्वसूचना आणि सर्वांना सावध करण्याच्या पूरपरिस्थिती त्वरित गंभीर होऊ शकते. अशा वेळी सर्वांना सावधान करण्यासाठी समित्या स्थापना करणे अशी कामे आपत्ती व्यवस्थापनात येतात.
यावेळी सर्व तलाठ्यांना कार्यपुस्तिका देखील भेट दिल्या. त्यात सर्व नद्या आणि आपत्ती यासंदर्भात सर्व माहिती अद्ययावत केलेली आहे.