दुष्काळीस्थिती निर्माण झाल्याने शंभर टक्के पीक विमा देऊन चारा छावण्या सुरू करा

काँग्रेससह शेतकरी आणि विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी ) यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा , गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्यांसाठी काँग्रेससह शेतकरी आणि विविध संघटनांनी एकाचवेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन साकडे घातले.
अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातील परिस्थिती पावसाअभावी खराब झाली आहे. दुबार व तिबार पेरणी करूनही शेतकर्‍यांच्या हातात उत्पन्न हातात येणार नाही. जी पिके आली  आहेत ती देखील खराब वातावरणामुळे कोमेजले आहेत. भविष्यात तालुक्यात  पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग प्रामाणिक करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी आणि बकऱ्या, मेंढ्या, म्हशी,गाय, बैल या पशुधनास चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 

अमळगाव मंडळातील शेतकऱ्यांची तक्रार

तर अमळगाव मंडळातील शेतकऱ्यांनी तक्रार केली की दीड महिन्यात फक्त ४५ मिमी पाऊस पडला आहे. तिबार पेरणी करूनही उपयोग झालेला नाही. रखडलेल्या पाडळसरे प्रकल्पामुळे तापीला पूर येऊनही पाणी अडवता येत नाही. शेतकरी आर्थिक दृष्ट्य व मानसिक दृष्ट्या खचला आहे. त्यामुळे तालुका दुष्काळी जाहीर करावा आणि विमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना १०० टक्के विमा द्यावा, अशी मागणी केली आहे.

तालुका फ्रुट सेलने दिले निवेदन

तर तालुका फ्रुट सेलचे चेअरमन श्याम पाटील यांनी मागणी केली की गेल्या वर्षी अतिवृष्टीत ५२ गावांचा नुकसानीचा मोबदला मंजूर झाला पण ३२ गावांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पंचनामे आणि निकष चुकीचे असल्याने शेतकरी होरपळला जातो , आताही ७२ तासात पीक न आल्यास विमा मिळायला पाहिजे होता पण मिळालेला नाही तरी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते पंचनाम्याचे आदेश द्यावेत. यावेळी काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरण पाटील , सचिव बी के सूर्यवंशी , नीलकंठ पाटील , जयवंतराव पाटील,पांडुरंग पाटील , दिलीप पाटील , साहेबराव पाटील ,समाधान धनगर , प्र सुनील पाटील ,  सुभाष पाटील , दिनेश पाटील , चंद्रकांत पाटील , परमेश्वर पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना सरपंच व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

तालुक्यातील विविध खेड्यांवरील सरपंच व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे याना  निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करावा व तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली असून निवेदनावर गंधली सरपंच नरेंद्र पाटील , उपसरपंच राजश्री महाजन , पिळोदा सरपंच भारती पाटील, उपसरपंच पद्मबाई पारधी, पिंपळी सरपंच प्रेमराज महाजन, उपसरपंच आबा बहिरम, जळोद सरपंच भारती साळुंखे , उपसरपंच कल्पनाबाई भोई , कल्पना चौधरी ,खवशी सरपंच गौरी कैलास पाटील , उपसरपंच गणेश पाटील , अरुण देशमुख , कैलास पाटील , मनोज महाजन यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *