माजी आमदार साहेबराव पाटील यांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) पावसाने पाठ फिरवल्याने बोरी मध्यम प्रकल्पातून पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील नदीकाठांवरील गावांसाठी शेती सिंचनासह लोकांना आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांना मेलद्वारे पत्र पाठवले आहे.
<span;>माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बोरी मध्यम प्रकल्प, तापी खोरे मधील बोरी उपखोरे मध्ये येतो. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ६३९८ चौ. कि.मी. असून प्रकल्पाचा एकूण जलसाठा ४०.३१ दलघमी (१.४० टिएमसी) आहे. २७ जुलै २०२१अखेर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होवून पाणी पातळी २६५.५५ मीटरपर्यंत असून जीवंत साठा १३.३७९ दलघमी आणि मृतसाठा १५.१६ दलघमी एवढा असून त्याची टक्केवारी ५३.२० आहे. त्यामुळे पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील नदीकाठांवरील गावांसाठी शेती सिंचनासह लोकांना आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे.
पावसाची नगण्य हजेरी
पारोळा तालुक्यातील सन २०२१ या खरीप हंगामातील पर्जन्यमान ६१९.७६ मी.मी. पैकी २७ जुलै, २०२१ अखेर ३४०.६० मी.मी. एवढे झालेले आहे. आणि अमळनेर तालुक्यातील चालू खरीप हंगामातील पर्जन्यमान ५८९.०० मी.मी. पैकी २७ जुलै, २०२१ अखेर फक्त ११०.०५ मी.मी. एवढे नगण्य पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुमारे ४० हजार हेक्टरात दुबार पेरणी होवून ही सर्वच नक्षत्रांनी यावर्षी पाठ फिरवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.