प्रत्येकाने प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी एक झाड लावावे

इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) प्रत्येकाने प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी एक झाड लावावे, असा पर्यावरणाचा संदेश देत शेतकऱ्यांनी आहे त्यापेक्षा कमी शेती करावी, मात्र शेतात शेततळे अवश्य उभारावे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे आवाहनही हभप निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी केले.
अमळनेर येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जी माणसे स्वतःसाठी जगतात ती जीवंत असूनही मेलेली असतात आणि जी माणसे दुसऱ्यासाठी जगतात ती कधीच मरत नाहीत, असे प्रतिपादन करून हभप निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी जीवनाला धार्मिकतेची जोड देताना जीवनात मोठेपणा येण्यासाठी यातना भोगाव्या लागतात, समाजाचे आघात सहन करण्याची ताकद पाहिजे. जी दगडं घाव सहन करतात तीच मूर्ती होतात. कोरोनाच्या काळाबद्दल बोलताना ते म्हणाले की दीड वर्षात लोकांना चांगले ऐकायला मिळाले नाही, म्हणून ते बधिर झाले आहेत. जगाला सुखी करण्याची ताकद संत संगतीत आहे. सगळे जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. या वेळी माजी आमदार साहेबराव पाटील, अॅड. ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, संचालक प्रा. श्याम पाटील, पराग पाटील, वेदश्री पाटील, माजी सभापती प्रफुल पाटील, पसचे माजी सभापती श्याम अहिरे, जिप सदस्या संगीता भिल, शीतल देशमुख ,  हिरालाल पाटील  व्यासपीठावर उपस्थित होते. अॅड. ललिता पाटील यांनी इंदोरीकर महाराज यांचा सत्कार केला. कीर्तनास उमेश वाल्हे ,जयवंतराव पाटील, विक्रांत पाटील, कल्याण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *