अमळनेर (प्रतिनिधी) शेतीच्या वाटा हिश्श्यावरून भाऊ हे एकमेकाच्या जिवावर उठल्याची घटना तालुक्यातील धार येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी दोन्ही गटातर्फे मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धार येथील दिलीप शेंनपडू पाटील याने फिर्याद दिली की २१ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शेतात मशागत करीत असताना लहान भाऊ संजय शेनपडू पाटील त्याठिकाणी आला व तुम्ही शेतात काम करू नका मी सांगतो त्याप्रमाणे वाटा हिस्सा पाडा अन्यथा तुम्हला शेती करू देणार नाही. आणि शिवीगाळ करू लागला त्यावेळी मोठे भाऊ सुखदेव व मुलगा प्रतीक यांनी शिवीगाळ करू नको वडिलांनीच तसा वाटा पाडला आहे असे सांगितल्यावर त्याने हातातील लोखंडी पाईप ने सुखदेव व प्रतिकच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले व दिलीप यास देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
जिवंत न ठेवण्याची दिली धमकी
तसेच संजय शेनपडू पाटील याने देखील मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दिलीप पाटील , प्रतीक पाटील , सुखदेव पाटील ,दिवेश पाटील यांनी वाटा हिश्याच्या वादावरून पत्नी मंदाकिनी विनवणी करीत असताना देखील तिला पाठीवर काठीने मारहाण करून शिवीगाळ केली व पुन्हा हिस्सा मागितला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दोन्ही गटातर्फे गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.