अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील माहिजी देवी मंदिरातील २२ किलोचा पितळी घंटा चोरीला गेल्याची घटना २२ रोजीच्या मध्यरात्री घडली
पातोंडा मठगव्हान रस्त्यावर वसलेल्या पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान व गावाचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र श्री माहिजी देवी मंदिर देवस्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्याच वर्षी भाविकांनी मंदिराला अंदाजित २२ किलो असलेला पितळी घंटा भेट दिलेला होता. नित्यनेमाने मंगळवारी (दि.२२ रोजी) पुजारी मंदिरात पूजेसाठी आले असता त्यांना मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार उघडे दिसले आणि आत बघता मंदिरातील पितळी घंटा,तांब्याचे फुलपात्र, पितळी पंचआरती आदी वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.प्रवेशद्वाराचे कुलुपही नेण्यात आले होते. तर मंदिराच्या बाहेर असलेल्या काही मुंजोबा मंदिरातील घंटाही चोरीला गेल्याचे दिसून आले. येथील रहिवाशी नोकरीनिमित्त बाहेरगावी शिक्षक असलेले भाविक प्रविण राजाराम बिरारी यांनी मंदिर परिसरात होत असलेल्या चोऱ्या व रात्री होत असलेल्या गैरकामांना आळा बसावा यासाठी जानेवारी महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली होती. त्याच वेळी मंदिर प्रशासनाने परिसरात कॅमेरे बसविले असते तर आज झालेली चोरीची घटना टळली असती किंवा चोरी करणारे चोरटे ओळखण्यात मदत झाली असती अशा चर्चा ग्रामस्थांमधून होत होत्या. दरम्यान मागील काळात मंदिरात आधीही तीन चोऱ्या झालेल्या आहेत.