अमळनेर (प्रतिनिधी) महसुली कराकडे दुर्लक्ष करणार्या इंडक्स कंपनीचे २ मोबाईल टॉवर सील करून तहसीलदारांनी चांगलाच दणका दिला आहे. आले आहेत. तर अमळनेर तालुक्यातील विविध मालमत्ता धारकांकडे महसूल कराची अडीच कोटी थकबाकी असून याकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अमळनेर तालुक्यातून एकूण साडे तीन कोटी महसूल कर अपेक्षित असताना फक्त एक कोटी रुपये वसुली झाली आहे. ८ ते १० मोठे थकबाकीदारांसह अनेकांवर अद्यापही अडीच कोटी थकबाकी असून वसुलीचे काम जोरात सुरू आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशाने शहर तलाठी महेंद्र भावसार, हर्ष मोरे व प्रथमेश पिंगळे यांनी इंडेक्स कंपनीकडे असलेल्या वार्षिक १३ लाख रुपये थकबाकी करापोटी मोबाईलचे चिकाटे गल्ली व कुंटे रोड चौकातील दोन टॉवर सील केले आहेत. पुढील आदेशापर्यंत सील उघडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही नोटीस चिकटवून देण्यात आला आहे. दरम्यान इंडक्स कंपनीने २५ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली आहे. नागरिकांनी महसूल कर न भरल्यास त्यांच्या मालमत्ता सील करण्यात येतील, असा इशारा तहसीलदार वाघ यांनी दिला आहे.