अमळनेर (प्रतिनिधी) शहरात अनधिकृत कोविड सेंटर चालवणाऱ्या एका खाजगी डॉक्टरला इंसिडन्ट कमांडर सीमा अहिरे यांनी साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाईबाबत नोटीस दिली असून दोन दिवसात समक्ष खुलासा मागितला आहे.
मुंदडा कॉम्प्लेक्स मधील डॉक्टर रुपेश संचेती यांच्या खाजगी दवाखाण्यात अनधिकृत कोविड सेंटर सुरू असल्याची तक्रार इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे त्या स्वतः पालिकेचे अधिकारी संजय चौधरी यांच्यासह पथक तेथील रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी गेले असता डॉक्टर संचेती यांनी त्यांना प्रवेश करू न देता अरेरावी केली. त्यामुळे डॉक्टर संचेती यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई का करू नये म्हणून नोटीस दिली असून दोन दिवसात समक्ष खुलासा मागितला आहे. खुलासा न आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान गेल्या वर्षी देखील डॉ संचेती यांच्या विरुद्ध अशी तक्रार प्राप्त झाली होती.
कोरोना रुग्णांची अडचण व समस्या आणि योग्य दरात योग्य उपचार होण्यासाठी कोविड सेंटरची नोंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या , मृत्यू दर , बेडची उपलब्धता आदी बाबीची माहिती मिळते. तसेच या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याचे सामान्यांना कळते संसर्ग होत नाही. त्यामुळे डॉक्टर संचेती यांनी देखील परवानगी घेऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करावेत जेणे करून नॉन कोविड रुग्ण तेथे जाऊन संसर्ग वाढणार नाही असे आवाहन प्रांत अहिरे यांनी केले आहे.